मुंबई : भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची संख्या अपुरी पडते आहे. वेळेत आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास रुग्णाचा जीव जाऊ शकतो. भारतातील ही परिस्थिती पाहून अमेरिकेतील मराठी डॉक्टरांनी भारतातील कोरोना रुग्णांसाठी मोफत मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. 


चार डॉक्टरांनी एकत्र येत एमडीटॉकच्या (www.mdtok.com/org/covid19) माध्यमातून कोरोनाग्रस्तांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या सहाय्याने रुग्णांना हा सल्ला घेता येईल. विशेष बाब ही आहे की यासाठी कोणतेही शुल्क आकारलं जात नाहीये. मुंबईच्या शेठ जी.एस वैद्यकीय कॉलेजातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या डॉ.अभिजीत नाकवे यांनी डॉ.मोहित गुप्ता, डॉ. निशांत सांगोळे आणि मूळचे नाशिकचे असलेले पीएचडी धारक डॉ. हेमराज गायधनी यांच्या साथीने हा उपक्रम सुरू केला आहे.  यासाठीचे तांत्रिक सहाय्य अमेरिकेतील सॉफ्टवेअर इंजिनियर जॉन प्लेटेको आणि ग्लेन मॉर्टेन यांनी दिले आहे. 


या उपक्रमात सहभागी होणाऱ्या डॉक्टरांची संख्या वाढत चालली असून ती आता 250 पर्यंत पोहोचली आहे. मार्गदर्शन करणारे सगळे डॉक्टर्स हे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स असून त्यांची अपाँईंटमेंट मिळण्यासाठी 3-4 महिने थांबावं लागतं. शिवाय त्यांची फी ही हजारो डॉलर्स असते. भारतातील अडचणीत सापडलेल्या रुग्णांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून या डॉक्टरांनी विनाविलंब, विनाशुल्क मार्गदर्शन करायला सुरुवात केली आहे.


अमेरिकेतील डॉक्टरांसोबतच सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, दुबई, कॅनडा इथले भारतीय वंशाचे डॉक्टर्सही जोडले जाऊ लागले असल्याचं डॉ. अभिजीत नाकवे यांनी सांगितले. कोरोनाच्या रुग्णांना मराठी, पंजाबी, गुजराती,हिंदी, तमिळ, तेलुगू या भाषांमधून सध्या डॉक्टर मार्गदर्शन करत आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या