मुंबई : 'इंडियन आयडॉल 10' ची स्पर्धक अवंती पटेल सायबर फ्रॉडची बळी ठरली आहे. सायबर फ्रॉडद्वारे अवंती आणि तिच्या बहिणीच्या अकाऊंटमधून तब्बल एक लाख 70 हजार रुपयांची चोरी झाली आहे. चोरट्यांनी यूपीआयच्या माध्यमातून तिच्या अकाऊंटमधून पैसे चोरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अवंती पटेलने या प्रकरणी मुंबईच्या सायन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. तिच्या तक्रारीनुसार, "तिला नुकतंच नवं डेबिट कार्ड मिळालं होतं. पण ते अॅक्टिव्हेट झालं नव्हतं. 31 डिसेंबरला दुपारी अडीचच्या सुमारास तिला चोरट्याचा कॉल आला, त्याने त्याची ओळख पंकज शर्मा अशी सांगितली. तसंच आपण बँक एक्झिक्युटिव्ह असल्याचं तो म्हणाला. तुम्ही डेबिट कार्ड अॅक्टिव्हेट का केलं नाही अशी विचारणा करत आपण त्यासाठी मदत करु असं त्याने अवंतीला सांगितलं."

त्यानंतर कॉलरने तिच्याकडे डेबिट कार्डच्या एक्स्पायरी डेटची विचारणा केली. महत्त्वाचं म्हणजे त्याने तिचा बँक बॅलन्सही सांगितला, ज्यामुळे अवंतीचा त्याच्यावर विश्वास बसला. मग तिच्या फोनवर आलेला मेसेज एका मोबाईल नंबरवर पाठवण्यास सांगितलं. ही बँकेची प्रोसिजर असल्याचं वाटल्याने अवंतीने ती फॉलो केली. तिने मेसेज फॉरवर्ड केला. पण मेसेज पाठवताच तीन ट्रान्झॅक्शनमधून तिच्या अकाऊंटमधून 50 हजार रुपये गेले. मात्र कॉलरने 10 मिनिटांत पैसे परत येतील, असं आश्वासन दिलं. पैसे पुन्हा जमा होण्यासाठी कॉलरने तिच्या दुसऱ्या अकाऊंटची विचारणा केली.

दुसरं अकाऊंट नसल्याने 'गॅरेंटर' म्हणून कॉलरने कुटुंबातील इतर सदस्यांच्या अकाऊंटबद्दल विचारलं. यानंतर अवंतीने त्याच बँकमधील तिच्या बहिणीच्या डेबिट कार्डची एक्स्पायरी डेट सांगितली. यानंतर कॉलरने पुन्हा संबंधित खात्याची माहिती आणि बहिणीचा मोबाईल नंबरही अवंतीला सांगितला. पुन्हा अवंतीला मेसेज मोबाईल नंबरवर शेअर करण्यास सांगितलं. यावेळीही तीन ट्रान्झॅक्शनद्वारे 50 हजार रुपये तिच्या बहिणीच्या खात्यातून गेले. तेव्हाही कॉलरने काही मिनिटांत पैसे जमा होण्याचं आश्वासन दिलं.

परंतु बराच वेळ झाल्यानंतरही खात्यात पैसे परत न आल्याने तिने कॉलरला कॉल केला. पण तो नंबर बंद येत होता. यानंतर आपली फसवणूक झाल्याचं अवंतीला लक्षात आलं आणि तिने सायन पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. शिवाय तिने दोन्ही डेबिट कार्डही ब्लॉक केले.

मात्र रात्री चोरट्याला तिच्या अकाऊंटमधून 50 हजार आणि बहिणीच्या अकाऊंटमधून 20 हजार रुपये काढण्यात यश आलं. दोन्ही कार्ड ब्लॉक करुनही चोरट्याने पैसे काढले हे विशेष.

"चोरट्याने दोघींच्या बँक खात्यांची सगळी माहिती कशी काय मिळाली, दोन्ही कार्ड ब्लॉक असूनही त्यामधून पैसे कसे काय ट्रान्सफर केले", असे प्रश्न आम्हाला पडल्याचं अवंतीचे वडील पंकज पटेल म्हणाले. तसंच डेटामध्ये छेडछाड करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

"चोरट्याने बनावट यूपीआय बनवून त्याचा वापर केला. यामुळे चोरट्याला तिच्या अकाऊंटची संपूर्ण माहिती मिळाली. या प्रकरणात डेटा लीक झाल्याची शक्यता असू शकते. अवंती पटेलने केवळ एक्स्पायरी डेट शेअर केली, परंतु चोरट्याकडे आधीच सर्व माहिती होती," असं या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितलं.