विरार : लॉकडाऊनमुळे प्रवासी साधने बंद असल्याने पायी प्रवास करुन घरी जाणाऱ्या सात मजुरांचा विरारमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.


कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्वच प्रवासी साधने बंद असल्याने लोकांनी पायी घरी जाण्यास सुरुवात केली आहे. वसईमध्ये कामानिमित्त असलेले हे सात जण आपल्या घरी म्हणजे गुजरातला जात होते. परंतु संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे, गुजरातकडील हद्द बंद असल्याने त्यांना परत पाठवण्यात आलं होतं. वसईच्या दिशेने परत येत असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीतील भारोल परिसरात एका भरधाव आयशर टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली.


सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, म्हणाल्या रस्त्यांमध्ये अडकलेल्या मजुरांची सोय करा


या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले असून त्यामधील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातातील दोघांची ओळख पटली असून पाच जणांची ओळख अद्याप समजलेली नाही. ओळख पटलेल्यांपैकी एकाचं नाव कल्पेश जोशी (वय 32 वर्ष) तर दुसऱ्याचं नाव मयांक भट (वय 34 वर्ष) आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास करत आहेत.





भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषणेनंतर संपूर्ण देशातील प्रवासी साधनांची वाहतूकही बंद झाली. परंतु तरीही काही जण जीव धोक्यात घालून मिळेल त्या वाहनाने प्रवास करत असल्याचे व्हिडीओ समोर आले. काही जण ट्रकच्या मागे लटकून प्रवास करताना दिसले. तर काही जण एका ट्रकमध्ये अक्षरश: दाटीवाटीने, कोंबून प्रवास करत होते.
हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जिथे आहात, तिथेच राहणं गरजेचं आहे. कारण पुढील काही दिवस राज्यासाठी कसोटीचे असल्याचं त्यांनी सांगितलं. तरीही लोक असा जीवघेणार प्रवास करत आहेत.


Coronavirus Outbreak | लॉकडाऊनमुळे मजूर आणि विद्यार्थ्यांवर पायी प्रवास करण्याची वेळ