मुंबई :  विरोधकांची आघाडी असलेल्या 'इंडिया'ची बैठक (India Alliance Meeting) उद्यापासून मुंबईत (Mumbai) आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीच्या आधी राज्यातील वंचित बहुजन आघाडीदेखील (Vanchit Bahujan Aghadi) इंडिया आघाडीत येणार का, अशी चर्चा सुरू झाली. आम्हाला बैठकीचे कोणतेही आमंत्रण आले नव्हते असे, वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले. त्यानंतर आज इंडिया आघाडीच्या बैठकीच्या आधी आज महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीच्या प्रवेशावर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वंचितच्या प्रवेशाबाबत भाष्य केले. 


उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, शिवसेना आणि प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीमध्ये 23 जानेवारी रोजीच युती झाली आहे. आम्ही इंडिया आघाडीत एकत्र आलो आहोत, ते वेगळे होण्यासाठी नाही. आघाडीतील सहभागाबाबत प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत एकत्र चर्चा करण्यात येईल. त्यांच्या प्रतिसादानंतर राज्यातील महाविकास आघाडी आणि देशपातळीवरील 'इंडिया' आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश होईल असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 


आज झालेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते. 


दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली. भारत मातेचं रक्षण करण्यासाठी एकत्र आलो आहोत. संविधानाचे रक्षण करणे, देशातील हुकूमशाही दूर करणे हे उद्दिष्ट्य असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. मुंबईतून ब्रिटिशांविरोधात 'चले जाव'चा नारा देण्यात आला होता. ब्रिटिशही विकास करत होते. पण त्यांनाही चले जाव म्हटले. आम्हाला विकासासोबत स्वातंत्र्य, लोकशाही हवी आहे. आता सरकारला पुन्हा 'चले जाव' सांगायचे आहे, असे म्हटले. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची कपात करण्याच्या निर्णयावर उद्धव  ठाकरे यांनी निशाणा साधला. मागील 9 वर्षात रक्षाबंधन साजरा झाला नव्हता का, त्यावेळी भगिनींची आठवण आली नव्हती का, असा प्रश्न ठाकरे यांनी भाजपला विचारला. 


उद्याच्या बैठकीत काय होणार याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सूचक वक्तव्य केले. उद्यापासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या बैठकीत इंडिया आघाडीत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झाल्या असून आता आघाडीचा कार्यक्रम ठरणार असल्याची शक्यता पवारांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 


Uddhav Thackeray INDIA : Prakash Ambedkar यांना INDIAचं निमंत्रण का नाही? ठाकरेंनी दिलं उत्तर



इतर संबंधित बातम्या :