मुंबई : मुंबईत लग्न जुळवणाऱ्या मेट्रोमोनियल साईटवरुन ओळख करून एका महिलेनं तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. पवई पोलिसांनी फिर्यादी सौरभ कुमार अवस्थी या तरुणाच्या तक्रारीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.


राधिका दीक्षित या 32 वर्षीय महिलेनं सौरभ कुमारला 23 लाख रुपयांना गंडा घातला आहे. जीवनसाथी डॉट कॉम या लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवर त्याने नाव रजिस्टर केलं होतं. या वेब साईटवरूनच त्याची राधिकाशी ओळख झाली. काही दिवस त्यांच्यामध्ये मोबाईलवरून संभाषण सुरू होते. राधिकाने सौरभला विश्वासात घेत आई, वडील आजारी असल्याचं सांगत पैशाची मागणी केली.


त्यानंतर विविध कारणं सांगत तिने सौरभकडून रोख रक्कम आणि महागडा मोबाईल घेतला. विशेष म्हणजे राधिका आणि सौरभची कधीही समोरासमोर भेट झाली नव्हती. मात्र सौरभला संशय आल्याने त्याने तिच्याकडे भेटण्याचा तगादा लावला, त्यानंतर ती सौरभला भेटण्यास तयार झाली.


मात्र राधिका समोर आल्यावर सौरभला धक्काच बसला. प्रोफाईल फोटोमध्ये असेलली तरुणी वेगळी होती. तिचं नावही वेगळं होतं. या महिलेकडे सौरभने दिलेले पैसे मागितले, तेव्हा तिने ते देण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने पोलिसात तक्रार केली. आता पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.