कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका वैजयंती घोलप या अडचणीत आल्या आहेत. कारण जाधवैधता पडताळणी समितीनं त्यांचं जातवैधता प्रमाणपत्र रद्द केलं आहे.


घोलप या कल्याणच्या रामबाग प्रभागातून सलग पाचवेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. 2010 नंतर त्यांचा प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी धनगर जातीचं प्रमाणपत्र जोडत निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांना महापौरपदही मिळालं होतं.


मात्र घोलप या धनगर नसून खाटीक आहेत, तसेच खाटीक ही जात अनुसूचित जमातींमध्ये येत असल्यानं त्यांनी ओबीसी प्रवर्गातून लढवलेली निवडणूक रद्द ठरवण्याची मागणी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार गौरव गुजर यांनी केली होती. त्यानुसार झालेल्या सुनावणीत पुराव्यांच्या आधारे जातवैधता समितीने घोलप या धनगर नसून खाटीक असल्याचा निकाल देत त्यांचं ओबीसी प्रमाणपत्र रद्द केलं.


त्यामुळे आता घोलप यांचं नगरसेवकपद धोक्यात आलं आहे. मात्र जातवैधता पडताळणी समितीचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करत याविरोधात आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची भूमिका वैजयंती घोलप यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे घोलप यांचा बाजू न्यायालयात टिकणारी नसून आपल्याला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं मत तक्रारदार गौरव गुजर यांनी व्यक्त केलं आहे.