मुंबई : महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामे प्रगतिपथावर आहेत. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) यांची गुणवत्‍ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्‍यामुळे रस्ते विकासाची अंमलबजावणी करताना आवश्यक तो दर्जा, गुणवत्ता राखण्याची जबाबदारी भारतीय तंत्रज्ञान संस्थेकडे असेल. या कामकाजासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्‍यात आज, दिनांक ११ सप्‍टेंबर २०२४ रोजी सामंजस्‍य करार (MoU) करण्‍यात आला आहे.


बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत सामंजस्‍य करारावर स्‍वाक्ष-या करण्‍यात आल्‍या. महानगरपालिकेच्‍यावतीने प्रमुख अभियंता (रस्‍ते व वाहतूक) श्री. गिरीश निकम यांनी तर, भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍यावतीने अधिष्‍ठाता (संशोधन व विकास) प्रा. सचिन पटवर्धन यांनी स्‍वाक्षरी केली. यावेळी भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे उपसंचालक प्रा. के.व्‍ही.कृष्‍ण राव, अधिष्‍ठाता पी. वेदगिरी, प्रा. सोलोमन देबबर्मा यांच्‍यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. स्‍वाक्षरीनंतर सामंजस्‍य कराराची प्रत आदानप्रदान करण्‍यात आली.


बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर तर दुसऱया टप्प्यात ३०९ किलोमीटर असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरातील रस्तेकामांचा समावेश आहे. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था यांची गुणवत्‍ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था (थर्ड पार्टी) म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी घेतला आहे. त्‍या अनुषंगाने आज, दिनांक ११ सप्‍टेंबर २०२४ बृहन्‍मुंबई महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्‍यात सामंजस्‍य करार (MoU) करण्‍यात आला आहे. दुस-या टप्‍प्‍यातील ५ पॅकेज (शहर विभाग १, पूर्व विभाग १ आणि पश्चिम विभाग ३) आणि पहिल्‍या टप्‍प्‍यातील १ पॅकेजच्‍या कामांची गुणवत्‍ता तपासणी व अनुषंगिक कामे भारतीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत केली जाणार आहेत.


सामंजस्‍य करार स्‍वाक्षरीप्रसंगी महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी म्‍हणाले की, भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्‍या नियुक्‍तीमुळे सिमेंट काँक्रिट रस्‍त्‍यांच्‍या कामात अत्‍युच्‍च गुणवत्‍ता राखली जावी यासाठी मदत होणार आहे. अधिक गतीने कामे करताना गुणवत्‍ता ढासळू नये यासाठी कोणत्‍या बाबींची काळजी घ्‍यावी यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मार्गदर्शन करणार आहे.


या उपक्रमामागील भूमिका विशद करताना अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर म्‍हणाले की, रस्ते विकासाची अंमलबजावणी करताना जाणीवपूर्वक कमी गुणवत्‍तेचे कामकाज होऊ नये म्‍हणून दक्षता (vigilance) घेणे, यांबरोबरच कामाची अंमलबजावणी करताना अजाणतेमुळे होणा-या चुका टाळण्‍यासाठी मार्गदर्शन आणि अत्‍युच्‍च गुणवत्‍तेची काळजी घ्‍यावयाची बाबी या सर्व बाबींमध्‍ये भारतीय तंत्रज्ञान संस्‍था मार्गदर्शन करेल. आकस्मिक भेटी (surprise visit),  कार्यस्‍थळास प्रत्‍यक्ष भेट देणे, त्‍याबाबतची निरीक्षणे नोंदविणे, भेटीच्‍या दरम्‍यानची निरीक्षणे आणि त्‍यावरील सल्‍ला यांबाबत वेळोवेळी अभियांत्रिकी विभागास अधिका-यांसोबत प्रतिसाद मिळवेल. (feedback session) काँक्रिट प्लांटमध्‍ये मटेरियल बनविण्‍याच्‍या टप्‍प्‍यापासून ते काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण झाल्‍यानंतरच्‍या विविध चाचण्‍यांद्वारे भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्‍या माध्‍यमातून तपासणी केली जाईल.


रस्‍त्‍याची गुणवत्‍ता चांगली राहावी यासाठी क्‍युब टेस्‍ट, कोअर टेस्‍ट, स्‍लम्‍प कोन टेस्‍ट, ड्युरॅबिलीटी टेस्‍ट, फिल्‍ड डेन्सिटी टेस्‍ट आदी विविध तांत्रिक चाचण्यांच्या माध्यमातून दर्जा तपासला जाईल. अभियंत्‍याचे कौशल्‍य आणि कार्यक्षमता वाढविण्‍याबरोबरच अधिकारी व कंत्राटदार यांना गुणवत्तेबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी भारतीय तंत्रज्ञान संस्थेकडे आहे. थर्ड पार्टी ऑडिटमुळे अजाणतेमुळे होणाऱ्या चुका टाळण्‍यास आणि कामे गतीने पूर्ण होण्‍यास मदत होणार आहे.


रस्‍त्‍यांच्‍या देखभाल, पुनर्रचना व पुनर्वसनासाठी योग्‍य पद्धती निश्चित करण्‍याकामी आवश्‍यक सल्‍ला देणे, प्रत्‍येक प्रकरणाच्‍या आधारे आवश्‍यकतेनुसार तपासणी करणे, गुणवत्ता तपासणीचे निकष प्रत्येक प्रकरणाच्या आवश्यकतेनुसार तपासणे, गुणवत्ता आश्वासनासाठी चाचण्या घेणे आणि गुणवत्ता नियंत्रण चाचणी अहवालांची तपासणी करणे, तांत्रिक लेखापरीक्षण अहवाल तयार करणे आणि गुणवत्तेची खात्री करण्यासाठी नियमितपणे प्रकल्‍पस्‍थळास भेटी देणे इत्‍यादी बाबींचा समावेश भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्‍या कामकाजाच्‍या व्‍याप्‍तीत करण्‍यात आला आहे.