मुंबई : मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक पेशंट आहेत आणि लसीकरण आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. उद्या जर तातडीनं मुंबईला लस पुरवठा झाला नाही तर मुंबईतली सगळी लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातलाच नाहीतर देशभरातला कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतच लसीकरण ठप्प होणार आहे.


एक दिवसात मुंबईला लस मिळाली नाही तर परवा संपूर्ण मुंबईतील लसीकरण ठप्प होणार आहे. उद्या सर्व खाजगी सेंटर तर परवा सर्व शासकीय केंद्र सुद्धा लस पुरवठ्याअभावी बंद होणार आहे. आज मुंबईतील 50% लसीकरण केंद्र लस पुरवठ्याअभावी बंद आहेत. उद्या सर्व खाजगी लसीकरण केंद्र बंद होतील तर परवापर्यंत संपूर्ण मुंबईतील लसीकरण ठप्प होईल.


आज मुंबईतल्या 120 सेंटरपैकी 26 खाजगी लसीकरण केंद्र बंद झाली तर, 24 केंद्र आज संधयाकाळपर्यंत बंद होतील. मुंबईत एकूण 120 सेंटर आहेत त्यांपैकी 73 खाजगी सेंटर आहेत. 


आज बंद झालेली केंद्र



  • एच एन रिलायन्स 

  • ब्रिच कॅन्डी

  • हबीब

  • भाटीया

  • एलिझाबेथ 

  • लॉयन हॉस्पिटल

  •  सिटी केअर 

  • लाईफलाईन 

  • भाभा हॉस्पिटल


पंतप्रधानांसमोर चार प्रमुख विषय मांडणार : राजेश टोपे 
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत आम्ही चार महत्त्वाचे विषय मांडणार आहोत. हे विषय म्हणजे रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा आणि दर नियंत्रण, शेजारील राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा, कोरोना लसीचे डोस आणि व्हेंटिलेटर हे प्रमुख मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडणार आहोत, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.


केंद्राने लसीचे डोस वाढवले : राजेश टोपे  
नुकतंच मला केंद्राकडून माहिती मिळाली आहे की, कोरोना लसीचे डोस सात लाखांवरुन 17 लाखांवर वाढवण्यात आले आहेत. तरीही हे डोस कमी आहेत, कारण आम्हाला आठवड्याला 40 लाख डोसची गरज आहे. त्यामुळ 17 लाख डोस पुरेसे नाहीत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.


भाजपशासित राज्यांना जास्तीचा लस साठा
भाजप सरकार असलेल्या राज्यांना जास्तीचा लस साठा देण्यात आल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशला 44 लाख डोस, मध्य प्रदेशला 33 लाख डोस, गुजरातला 16 लाख लस, कर्नाटक 23 लाख डोस, हरियाणा 24 लाख डोस, झारखंड 20 लाख डोस केंद्राने दिले आहेत.


संबंधित बातम्या :


Maharashtra Corona Vaccine Row | लस वाटपात उत्तर प्रदेश, गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राबाबत दुजाभाव का? : राजेश टोपे