मुंबई : ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांना तिकीट मिळालं तर मी स्वत: त्यांच्याविरोधात निवडणूक लढवेन, असा इशारा शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी दिला आहे. निवडणूक अपक्ष लढवायची की शिवसेनेतून याचा निर्णय वरिष्ठ घेतील, असंही राऊत म्हणाले.

"किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांचा प्रचंड विरोध आहे. शिवसेनाच नव्हे तर स्वकीयांकडूनही किरीट सोमय्यांना विरोध आहे. सोमय्या यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी दिली तर भाजपला ही सीट गमवावी लागेल," असं सुनील राऊत यांनी सांगितलं.

सुनील राऊत म्हणाले की, "ज्यांनी आमच्या मंदिरावर टीका केली त्याला निवडून कसं आणणार? धनुष्य बाण आणि कमळासाठी काम करु पण सोमय्यांसाठी करणार नाही. जर किरीट यांना तिकीट मिळालं तर मी स्वतः त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार, अपक्ष की शिवसेनेतून याचा निर्णय वरिष्ठ करतील. वेळ आलीच तर गुढी पाडव्याला उमेदवारी अर्ज भरणार आहे."

सुनील राऊत हे शिवसेनेचे मुंबईतील विक्रोळीचे आमदार आहेत. ते शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू आहेत.

'मातोश्री'वरुन भेट नाकारली
दुसरीकडे आज किरीट सोमय्या यांना 'मातोश्री'वरुन भेट नाकारली आहे. किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे शिवसेनेत सोमय्यांविषयी नाराजी आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांकडून उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्याकडून शिवसेनेचे खासदार संजय राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर आणि नेते अनिल देसाईंच्या मनधरणीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे. मात्र, या प्रयत्नांना अजूनही फळ मिळताना दिसत नाही.

VIDEO |...तर सोमय्यांविरोधात निवडणूक लढवेन : सुनील राऊत


संबंधित बातम्या

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी किरीट सोमय्यांचे प्रयत्न, मात्र 'मातोश्री'वरुन भेट नाकारली

सोमय्यांच्या डोक्यावरील टांगती तलवार कायम, फडणवीस-उद्धव ठाकरेंच्या बैठकीतही तोडगा नाही

किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध कायम, प्रविण छेडा उद्धव ठाकरेंच्या भेटीला

किरीट सोमय्यांनी केलेली टीका शिवसैनिक विसरलेले नाहीत : राहुल शेवाळे