मुंबई : भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे. "शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे" असा शब्दात शेलार यांनी ट्विटरवरुन राज ठाकरेंवर शरसंधान साधलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर 'बारामतीचा पोपट' म्हणून टीका केली होती. त्यानंतर राज ठाकरेंनीही फडणवीसांवर पलटवार केला होता. त्यानंतर हे 'बारामतीचं पोपट पुराण' सोशल मीडियावर सुरु झालं आहे. मनसेला रामराम ठोकलेले एकमेव आमदार शरद सोनावणेंवरुनही शेलारांनी टोला हाणला आहे.

'सोडून गेले नगरसेवक...सोडून गेले आमदार...एकटे एकटे वाटले म्‍हणून स्‍वतःच्‍या काकांच्या नाही..जाणत्‍या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्‍ट हातात देऊन.. बारामतीच्‍या काकांनी "फक्त लढ" असे म्‍हटले.!! "शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे" असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे.


#ChokidarकेSideEffects असा हॅशटॅग देऊन आशिष शेलार यांनी हे ट्विटरास्त्र सोडलं आहे. याला राज ठाकरे काय उत्तर देणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

काही दिवसांपूर्वीही आशिष शेलारांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला होता. #ChokidarकेSideEffects याच हॅशटॅगसह शरद पवारांवर टीका केली होती.

'एक नातू म्‍हणाला आजोबा आजोबा निवडणुका तुम्‍हीच लढवा...दुसरा नातू म्‍हणाला आजोबा आजोबा मीच "पार्थ" मीच लढणार...आजोबांना होती ताईंची काळजी...दादांना पोराची.. जाणते आजोबा नातवडांसमोर मुके.. मुके.. मुके.. आजोंबाच्‍या डोळयासमोर आता राजकीय धुके.. धुके.. धुके!' असं ट्वीट आशिष शेलारांनी केलं होतं.


 VIDEO | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं गाजलेलं भाषण | अमरावती