मुंबई : कोविड लस प्रभावीपणे निर्माण करून तिचे वितरण करणे ती देण्याबाबतचा प्राधान्यक्रम निश्चित करणे आणि त्या लसीची किंमत व प्रमाण ठरवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.


य़ा टास्क फोर्समध्ये वित्त, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, आरोग्य सेवा आयुक्त, वैद्यकीय शिक्षण संचालक, डॉ. शशांक जोशी त्याचप्रमाणे जे.जे. आणि केईएम रुग्णालयाच्या प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध विभागांचे प्रमुख सदस्य असतील.
या टास्क फोर्सने लस साठवण आणि वितरण व्यवस्थेसाठी शीत साखळी ठरविणे व लसीकरणाच्या शेवटच्या टप्प्यांपर्यंत आवश्यक बाबी तसेच किंमत ठरविणे अपेक्षीत आहे.


'कोरोना काळात पक्षांना राजकारण न करण्याच्या सूचना द्या', मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी


वितरणासाठी प्रत्येक राज्याने तयारीला लागावे : मोदी


कोरोना लसीवर अनेक पातळीवर संशोधन सुरू आहे. काही लशी अंतिम टप्प्यात आहे. मात्र लस कधी येणार हे सांगता येत नाही. लस येईल तेव्हा येईल. पण कोरोनाबाबत सतर्क राहा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. आगामी काळात कोरोना लसीच्या वितरणासाठी प्रत्येक राज्याने आतापासूनच तयारीला लागावे, अशा सूचनाही पंतप्रधानांनी यावेळी दिल्या. लस वितरणात राज्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण लशीचे वितरण राज्यांतील यंत्रणेच्या माध्यमातूनच पार पडणार आहे. या कामात राज्यांचा अनुभव कामी येणार आहे असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. मोदी म्हणाले की, आपल्यासाठी कोरोना लसीच्या वेगवान वितरणाबरोबरच लोकांचा जीव वाचवणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे लस 100 टक्के सुरक्षित आहे, हे शास्त्रज्ञांनी सांगितल्यानंतर ती भारतीयांना देण्यात येईल. राज्यांच्या सहकार्याने लसीचे वितरण केले जाईल. त्यामुळे राज्यांनी कोल्ड स्टोरेजच्या सुविधा उभारण्यासाठी कामाला लागावे, अशी सूचना देखील पंतप्रधान मोदी यांनी केली.


कोरोना लसीकरणासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापना; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत माहिती