अटल बिहारी वाजपेयींची पहिली भेट ते लोकसभा अध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत मनोहर जोशी यांनी एबीपी माझावर वाजपेयींच्या आठवणी जागवल्या.
"मी लोकसभा अध्यक्ष होईन असं वाटलंच नव्हतं. पण भाजप आणि वाजपेयींनी लोकसभा अध्यक्षाबाबतची भूमिका कायम घेतली. त्याचा मला फायदा झाला. वाजपेयींची ही भूमिका नसती तर मी अध्यक्ष झालो नसतो. पण तिथेच नाही महाराष्ट्रातही मी मुख्यमंत्रीपदावर पोहोचलो याचं कारण सुद्धा पर्यायाने अटल बिहारी वाजपेयी आहेत. महाराष्ट्रात त्यावेळी भाजपचं पूर्ण सहकार्य होतं", असं मनोहर जोशी यांनी सांगितलं.
तुम्ही मुख्यमंत्री होण्यामागे वाजपेयींचं योगदान होतं ते कशा प्रकारचं होतं असं मनोहर जोशींना विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले, "कोणत्याही पक्षात जेव्हा असा मोठा निर्णय घेतला जातो, तेव्हा तो पक्षप्रमुखाने घ्यायचा असतो. त्यांना पहिलं श्रेय मिळतं. ज्यांनी मला पद मिळण्यात सहकार्य केलं त्यात भाजप सुद्धा होतं, अशा अर्थाने मी म्हणालो"
बाळासाहेब-वाजपेयींचे संबंध कसे होते?
"बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी या दोघांचे संबंध चांगले होते. हास्यविनोद ऐकण्यासाठी बसावं तर या दोघांसोबतच बसावं. त्याचबरोबर कारभार करताना कठोर व्हावं लागतं. ते कठोर होणं हे ही दोघांमध्ये होते. पण अतिशय रागाने, भांडणाने कठोर व्हायचं असं नव्हतं.
या दोघांनी परस्परांना समजावून घेतलं होतं. त्यामुळे दोन्ही पक्षांनी पटवून घेतलं. विशेष आठवण म्हणजे हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेबांची भूमिका एक घाव दोन तुकडे अशी होती. पण सरकारमध्ये असताना, पंतप्रधान असल्याने वाजपेयींनी हा विषय हाताळला नाही. मुद्दाम महत्त्व दिलं नाही", असं मनोहर जोशी यांनी सांगितलं.
...ते काम वाजपेयींमुळे
माझ्यासमोर प्रश्न होता तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकरांची स्मृती खासदार आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याच होतं. ते काम मी करु शकलो, कारण या कल्पनेला अटलजींचा पूर्ण पाठिंबा होता. म्हणून तो मी विषय हाती घेतला. भाजपचे प्रमोद महाजन त्यावेळी विविध नेत्यांना भेटले होते. आज सभागृहामध्ये हिंदुत्त्वाचा मुद्दा नाही पण एक गोष्ट खरी हिंदुत्त्वाची आठवण येते ती सावरकरांच्या चित्रांमुळे आणि आज लोकसभेत कोणीही प्रवेश केला तर तिथे एक गोष्ट दिसून येते, की छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच्या रुबाबात घोड्यावर स्वार झाल्याचं दिसून येतं. त्यालाही कारण त्यावेळचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आहेत.
वाजपेयी हे अडचणीतून मार्ग काढणारा नेता होता, असं मनोहर जोशी यांनी नमूद केलं.
VIDEO- 10.50 ते 11.50 दरम्यानचा व्हिडीओ पाहा