मुंबई : मुंबईतील राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विनच्या कुटुंबातून स्वातंत्र्यदिनीच गोड बातमी आली आहे. भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पेंग्विनने पिल्लाला जन्म दिला.

राणीच्या बागेत पेंग्विनच्या तीन जोडीतील एका मादीने जुलै महिन्यात अंडं दिलं होतं. फक्त मुंबईतच नाही, तर देशभरात जन्माला येणारा हा पहिलाच पेंग्विन आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली.

15 ऑगस्टच्या रात्री 8 वाजून 2 मिनिटांनी अंड्यातून पिल्लू बाहेर आलं. डॉ. संजय त्रिपाठी आणि त्यांची टीम या पिल्लाचं वजन, पोषण याबाबत काळजी घेणार आहे.

सर्वात कमी वयाचा असलेला हंबोल्ट पेंग्विन मिस्टर मॉल्ट (तीन वर्षे) आणि त्याची जोडीदार फ्लिपर (साडेचार वर्षे) यांचं हे पिल्लू आहे.
अंडं दिल्यानंतर साधारण 40 दिवसांनी पिल्लाचा जन्म झाला.


राणीच्या बागेतले सात पेंग्विन गेल्या दोन वर्षांत मुंबईच्या वातावरणात चांगलेच रुळले. मार्च-एप्रिल आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर हा पेंग्विनच्या प्रजननाचा काळ असतो.