भिवंडी : गरोदरपणातही दारु आणि सिगरेट पिण्यासाठी पतीकडे सतत तगादा लावणाऱ्या पत्नीची पतीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडीतील अनगांव येथे घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपी पतीने घराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात तिचा मृतदेह पुरला होता. कल्पेश सुदाम ठाकरे (वय २६) असे आरोपीचे नाव आहे. तर माही उर्फ मनिषा (वय २३) असे मृतक पत्नीचे नाव आहे.



पोलीस सूत्रांनुसार, आरोपी कल्पेश ठाकरे याचा मनिषा हिच्याशी १० मार्च २०१६ रोजी प्रेमविवाह झाला होता. मनिषा ही व्यवसायाने बारबाला होती. त्यामुळे लग्नापूर्वीच दारु व सिगरेट पिण्याचे तिला व्यसन होते. मनिषा आठ महिन्यांची गरोदर असतानाही सतत पतीकडे दारु आणि सिगरेटची मागणी करायची. यावरुन कल्पेश आणि मनिषा यांच्यात वारंवाद वादही व्हायचे. अखेर रोजच्या त्रासाला कंटाळून 9 मार्चला कल्पेशनं गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याने मनिषाचा मृतदेह अनगांव येथील घराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात पुरला.

विशेष म्हणजे पोलीस व मनिषाच्या कुटुंबीयांची दिशाभूल करण्यासाठी कल्पेशने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार १२ मार्चला गणेशपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. यावेळी पोलिसांनी मनिषाच्या आईवडिलांशी संपर्क केला असता तिचा मोबाईल ९ मार्चपासूनच बंद येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी कल्पेश याला ताब्यात घेतलं. कल्पेशला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तात्काळ पत्नीच्या हत्येची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी मनिषाचा पुरलेला मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर कल्पेशला पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.