Dragon Fly Club Raid या मुंबईतील एका क्लबवर पोलिसांची कारवाई झाल्याचं वृत्त समोर आलं आणि यामध्ये अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली. अभिनेता हृतिक रोशन याची पूर्वाश्रमीची पत्नी, अर्थात एक्स वाईफ सुझान खान (suzanne khan) हिसुद्धा या ठिकाणी असल्याचं म्हटलं गेलं. मुळात सुझाननंही ही बाब नाकारली नाही.


कोरोना निर्बंधांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ड्रॅगन फ्लाय क्लब येथे उपस्थित असणाऱ्या 34 जणांवर कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये हॉटेलमध्ये उपस्थित असणारे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. समोर आलेल्या माहितीनुसार क्रिकेटपटू सुरेश रैना, गायक गुरु रंधावाही इथं हजर होते. मुंबईच्या विमानतळ परिसरात असणाऱ्या JW मॅरिएट हॉटेलमधील ड्रॅगन फ्लाय क्लब इथं ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान, त्या रात्री नेमकं काय घडलं होतं याची माहिती किंबहुना आपल्या अटकेच्या वृत्तांबाबतचं स्पष्टीकरण सुझान खान हिनं दिलं आहे.


इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहित तिनं आपण सदर स्थळी असल्याचं मान्य केलं. पोलिसांची कारवाई झाली तेव्हा नेमकं काय घडलं याबाबत सांगताना सुझान म्हणाली, 'काल रात्री आमच्या जवळच्या मित्रांपैकीच एकाच्या वाढदिवसानिमित्त डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं. आमच्यापैकी काही जण त्यानंतर ड्रॅगन फ्लाय क्लबमध्ये गेलो. जवळपास अडीच वाजण्याच्या सुमारास यंत्रणांचे काही अधिकारी त्या ठिकाणी आले. क्लब व्यवस्थापक आणि पोलीस यंत्रणांचे अधिकारी या प्रकरणी चर्चा करत त्यावर तोडगा काढत असतानाच उपस्थितांना जवळपास तीन तासांसाठी थांबवण्यात आलं. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आम्हाला तेथून सोडण्यातही आलं'.


इथं आपल्या अटकेच्या बातम्यांनी थैमान घातल्याचं पाहत सुझाननं लिहिलं, माध्यमांनी आमच्या अटकेचं जे वृत्त दिलं ते खोटं असून अतिशय बेजबाबदार आहे. आपल्या अटकेच्या वृत्ताचं खंडन करत सुझाननं लिहिलेल्या पोस्टमध्ये घटनेच्या वेळा अधोरेखित करत स्पष्टपणे काही गोष्टी सर्वांसमक्ष ठेवल्या.





सुरेश रैनाच्या टीमचीही सारवासारव


क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh raina) याच्या टीमनंही पोलिसांच्या या कारवाईनंतर सारवासारव केल्याचं पाहायला मिळालं. रैना चित्रीकरणासाठी मुंबईत आला होता. त्याला इथं लागू करण्यात आलेल्या कोणत्याही नियमावलीची कल्पना नव्हती. रात्री उशिरापर्यंत चित्रीकरणाचं काम आटोपल्यानंतर तो मित्राच्या पार्टीला गेला. कोरोना निर्बंधांबाबत माहिती नसल्यामुळं रैनाकडून अजाणतेपणानं चूक झाली असं सांगत तो यापुढं शासनाच्या सर्वच नियमांचं पालन करेल असा विश्वास देण्यात आला.


रैनासह इतरहांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्यााची चर्चा


कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी आणि दुसऱ्या लाटेचं संभाव्य संकट टाळण्यासाठी म्हणून महाराष्ट्रात नव्यानं काही नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये नाईट कर्फ्यूचं सध्या अनेक ठिकाणी सक्तीचं पालनही केलं जात आहे. पण, अद्यापही काही हॉटेल आणि तत्सम ठिकाणांवर मात्र नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. परिणामी पोलीस यंत्रणा अशा ठिकाणी कारवाईचा बडगा उगारताना दिसत आहे.