मुंबई: मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर लवकरच माफ होणार आहे. आज शिवसेनेच्या ठरावाची सूचना महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आली. शिवाय 500 ते 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात 60 टक्के सवलत मिळणार आहे.


शिवसेनेनं वचननाम्यात 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार शिवसेनेचे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी ठरावाची सूचना मांडली.

सभागृहात ही सूचना मंजूर झाली असून आता पालिका आयुक्त नगरविकास विभागाच्या मंजुरीसाठी ठराव पाठवतील आणि त्यानंतर मालमत्ता करमाफ आणि सवलतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील.

पालिकेवर कोट्यवधीचा बोजा पडणार:  

- सध्या मुंबईत ५०० चौ. फुटापर्यंतची साधारण १५ लाख घरं आहेत. गेल्या वर्षी ४,९०० कोटींचा मालमत्ता कर वसुली करण्यात आला होता.

- यंदाच्या वर्षी ५ हजार ४०० कोटीपर्यंत कर वसूल करण्याचं उद्दीष्ट आहे. पण ५०० स्के. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करांतून मुक्त केल्यास महापालिकेवर ४०० कोटींचा बोजा पडू शकतो.

- तसेच ७०० फुटांपर्यंतच्या घरांना करसवलत दिली तर शेकडो कोटींचा बोझा पालिकेला सोसावा लागेल. तसेच जकात बंद झाल्यानं ७००० कोटींचा फटकाही पालिकेला बसला आहे. करमाफीचा बोझा ५०० फुटांपेक्षा जास्त मालमत्ता असणाऱ्यांवर पडण्याची शक्यता आहे.