मुंबई : तुमच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असतील किंवा आजीबातच लक्षणे नसतील तर कोरोना घरी राहुनही बरा होऊ शकतो. मात्र, त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणंही तितकंच गरजेचं आहे. अन्यथा कोरोनाबाधितांचं रुग्णालयात न जाता होम क्वॉरंटाईन होणं जीवावर बेतू शकतं. गेल्या काही दिवसांत लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांचा अचानक झालेला मृत्यू होम क्वॉरंटाईन उपचार पद्धधतीविषयी साशंकता निर्माण करतोय.


9 जून – बीएमसीचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहत्या घरी मृत्यू झाला.


15 मे – शाहूनगर पोलीस स्टेशनमधे कार्यरत असलेले 32 वर्षीय पोलीस निरिक्षक अमोल कुलकर्णी कोरोनाबाधित होते. होम क्वॉरंटाईन असताना चेंबूरमधील राहत्या घरीच कोरोना उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.


23 मे – दक्षिण मुंबईतील एका डायबिटीक पेशंटवर 15 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर घरीच उपचार सुरू होते. मात्र त्यांची ऑक्सिजन लेव्हल खालवल्यानंतर त्याच्या मुलानं दिवसभर अँम्ब्युलन्स आणि हॉस्पिटल बेडसाठी फोन आणि धावाधाव केली. मात्र उपलब्ध न झाल्यानं त्यांचा घरीच मृत्यू झाला.


या सर्वांचे मृत्यू अगदी अनपेक्षित आणि धक्कादायक होते. सौम्य लक्षणे किंवा कोणतीच लक्षणे न दाखवणाऱ्या कोरोनानं यांचा अचानक घात केला. महत्वाचं म्हणजे फार गंभीर स्थिती नाही म्हणून यांना घरीच उपचार दिले जात होते. पण, हेच घरचे उपचार महागात पडले. सुरुवातीला जेव्हा कोरोनाग्ररस्तांची संख्या कमी होती, त्यावेळी प्रत्येक कोरोनाग्रस्त रुग्णालयात दाखल व्हायचा. मात्र, नंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी ज्या घरात होम आयसोलेशन शक्य असेल, त्या रुग्णांना घरीच थांबून उपचाराचा सल्ला दिला जाऊ लागला.


मुंबईत घरीच उपचार सुरू असलेले कोरोना रूग्ण - 18 हजार 797


विवीध रूग्णालयांत दाखल असलेले रूग्ण – 7600


सध्या मुंबईत प्रत्यक्ष उपचार सुरू असलेले रूग्ण – 26 हजार 379

जर खाटांची संख्या वाढत असेल तर उपलब्ध असलेल्या खाटा रुग्णांना जलदगतीनं का मिळत नाहीत? यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी आणि उपलब्ध रिकाम्या रुग्ण खाटांचे केवळ आकडे दाखवण्यासाठी कोरोनाबाधितांना घरीच राहा, असा सल्ला दिला जातोय का? असेही प्रश्न उपस्थित होतायेत. तसंच, होम क्वॉरंटाईनचा पर्याय निवडताना रुग्णांची वेळोवेळी तपासणी आणि गरज पडल्यास तातडीचे उपचार मिळणेही तितकच गरजेचं आहे. घरीच राहुन कोरोनाला हरवा हे वाक्य आपण कोरोनापासून प्रतिबंध व्हावा म्हणून वापरु शकतो. मात्र, कोरोना झाला तरी घरीच राहा हे मात्र जीवावर बेतू शकतं.