मुंबई : नालासोपारा शस्रसाठा प्रकरणी अटकेत असलेल्या अविनाश पवारची पोलिस कोठडी मुंबई सत्र न्यायालयाने 4 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. मात्र शुक्रवारच्या सुनावणीत कोर्टाने एटीएसची चांगलीच कानउघाडणी केली. अविनाश पवारला अटक केल्यानंतर तुम्ही सहा दिवस केलंत तरी काय? असा सवाल एटीएसला न्यायाधीश विनोद पाडळकर यांनी विचारला.
एटीएसने आरोपींच्या टार्गेटवर कोण होतं, त्यांची नावं उघड न करण्याची विनंती केली होती. नावं उघड झाल्यास तपासावर त्याचा परिणाम होईल, असं एटीएसचं म्हणणं होतं. मात्र कोण टार्गेट होतं आणि कोणाची रेकी करण्यात आली, याचा उल्लेख ऑर्डर कॉपीत करणं आवश्यक असल्याचं म्हणत कोर्टाने एटीएसची विनंती फेटाळून लावली.
नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयात धक्कादायक खुलासा केला. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या कन्या मुक्ता दाभोळकर, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्यरत असलेले प्राध्यापक श्याम मानव, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील नेते जितेंद्र आव्हाड आणि रितूराज नावाची व्यक्ती हे चार जण नालासोपारा प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या रडारवर होते, अशी माहिती महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने कोर्टात दाखल केलेल्या केस डायरीतून पुढे आली. या चौघांचीही रेकी करण्यात आली होती, अशी माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आल्याचं एटीएसनं म्हटलं आहे.
विशेष म्हणजे केस डायरीत हा कागद आधी नव्हता मग तो यावेळी कुठून आला? असा सवालही कोर्टाने एटीएसला विचारला, त्यावर एटीएसने गेल्या वेळीदेखील हा कागद होता असा दावा केला, पण "मी ही सगळी केस नीट वाचून आलोय, गेल्यावेळी हा कागद नव्हता" अशा शब्दात न्यायाधीशांनी एटीएसला खडसावलं.
तुम्ही या आरोपीची 14 दिवसांची पोलिस कोठडी मागत आहात पण त्याचा आणि या प्रकारातील इतर आरोपींचा संबंध अजूनही सिद्ध करु शकला नाहीत, अशा शब्दात एटीएसला कोर्टाने फटकारलं.
अविनाशकडून जप्त करण्यात आलेले पाच मोबाईल फोन, दोन सीम कार्ड्स यातून त्याने इतर सहआरोपींशी काही संपर्क साधला की नाही, याची माहिती तुम्हाला आतापर्यंत का काढता आली नाही? त्याचाकडून जप्त करण्यात आलेला 10 टीबीच्या डेटातून काय माहिती मिळाली? अविनाशच्या सोशल नेटवर्किंग अकाऊंट्सच्या पंचनाम्यातूनही त्याचा सहआरोपींशी संपर्क नसल्याचं दिसतंय. मग तो इतरांच्या संपर्कात होता असं तुम्ही कोणत्या आधारे म्हणतायंत? तसंच आरोपी राज्याबाहेर शस्र आणि बॉम्बस्फोटाच्या प्रशिक्षणासाठी गेला होता, तर मग सहा दिवसांत ती नावं अजूनही तुम्हाला कळली कशी नाहीत? तुमच्या रिमांड कॉपीत या सगळ्यांचा कोणाताही उल्लेख नाही असंही कोर्टाने एटीएसच्या निदर्शनास आणून दिलं. तुम्ही गौरी लंकेश प्रकरणातील अमोल काळेची कस्टडी मागितली आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती कोर्टाकडून करण्यात आली मात्र सरकारी वकिलांकडे कोणतही समाधानकारक उत्तर आलेलं नाही.
त्यापूर्वी एटीएसने कोर्टाकडे अविनाश पवारची 14 दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. अविनाश पवारने हिंदू धर्माच्या विरोधात असलेल्या लोकांची रेकी केली होती, त्याने राज्याबाहेर जाऊन शस्रास्त्र चालवण्याचं आणि बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं, असं एटीएसने सांगितलं. अविनाशकडून जप्त करण्यात आलेल्या डेटातून माहिती काढण्याचं काम सुरु आहे. तसंच त्याच्या डायरीत काही सांकेतिक भाषेतले संकेत मिळाले आहेत, त्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न सुरु आहे अशी माहिती एटीएसने दिली.
या प्रकरणातील आणखी एक आरोपी श्रीकांत पांगारकर याच्याकडून अविनाशला आर्थिक मदत झाली होती. त्याचाही तपास करायचा असल्याचं एटीएसने म्हटलं. तसंच या सगळ्यांचा मास्टरमाईंड कोण आहे ही माहितीही अविनाशकडून घ्यायची आहे, असंही एटीएसनं कोर्टाला सांगितलं. अविनाश प्रशिक्षणासाठी कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश अशा कोणकोणत्या ठिकाणी गेला होता? याचा तपास करायचा आहे त्याकरता त्याची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचंही एटीएसने म्हटलं. तसंच या प्रकरणात काही शस्रास्रं नष्ट करण्यात आली असून त्यात अविनाशची नेमकी भूमिका काय हे पाहायचं असल्याचंही एटीएसने म्हटलं. या सगळ्या प्रकरणात एक अल्टो आणि एक इनोव्हा कार तसंच चार दुचाकी वाहनं जप्त करण्यात आली आहेत. या व्यतिरिक्तही काही वाहनं वापरुन नष्ट करण्यात आली आहेत का? याचा तपास करायचा असल्याचंही एटीएसनं सांगितले.
बचाव पक्षाने मात्र अधिक पोलिस कोठडी देण्यास कडाडून विरोध केला आणि एटीएसच्या चौकशीतून अद्याप काहीही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. अविनाशचा तर इतर आरोपींशी कोणताही संबंध देखील नाही. आणि असल्यास एटीएस तसं काही सिद्ध करु शकलेलं नाही, असा युक्तिवाद केला गेला.
कोण आहे अविनाश पवार?
नालासोपाऱ्यातील स्फोटकांप्रकरणी मुंबईतील माझगाव डॉकमधून अविनाश पवार नावाच्या व्यक्तीला दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी (24 ऑगस्ट) रात्री बेड्या ठोकल्या.
स्फोटक प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. याआधी वैभव राऊत (9 ऑगस्ट), शरद कळसकर (10 ऑगस्ट), सुधन्वा गोंधळेकर (10 ऑगस्ट) आणि श्रीकांत पांगारकर (18 ऑगस्ट) यांना अटक करण्यात आली होती. या चौघांच्या चौकशीत अविनाश पवारचं नाव आल्यानंतर एटीएसने त्याला बेड्या ठोकल्या.
नालासोपारा स्फोटकं आणि दाभोलकर हत्येप्रकरणी अटकसत्र
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने 9 ऑगस्टच्या रात्री नालासोपाऱ्यातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्ता वैभव राऊतच्या घरी धाड टाकली. या धाडीत त्यांना स्फोटकं सापडली. याप्रकरणी वैभव राऊतला अटक केल्यानंतर एटीएसने चौकशीनंतर शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना 10 ऑगस्टला अटक केली.
नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करताना एटीएसला डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले. शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंदुरेचं नाव समोर आलं. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे मित्र आहेत. मग एटीएसने सचिन अंदुरेला औरंगाबादेतून 18 ऑगस्टला रात्री अटक केली. सचिन अंदुरेचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर एटीएसने त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवलं. सचिन अंदुरेनेच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला आहे. नालासोपारा स्फोटक प्रकरणात एटीएसच्या ताब्यात असलेल्या तिघांपैकी (वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसरकर) शरद कळसरकरने डॉ. दाभोलकरांच्या हत्येत सहभागाची कबुली दिली आहे, अशी माहिती एटीएसकडून देण्यात आली.
डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरेला अटक केली आहे. सचिन अंदुरे हाच दाभोलकर हत्या प्रकरणातील शूटर आहे, असं सीबीआयचं म्हणणं आहे.
'अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे मास्टरमाईंड'
अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे हे दोघे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे मास्टरमाईंड असल्याचा संशय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) आहे. त्यामुळेच अमोल काळेची सखोल चौकशी करण्यासाठी त्याची कोठडी घेण्याची तयारी डॉ. दाभोलकर हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआय टीमने केली आहे. इतकंच नव्हे, तर अमोल काळे आणि वीरेंद्र तावडेच्या आदेशावरुनच सचिन अंदुरे आणि शरद कळसकरने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा संशय सीबीआयला आहे.
अमोल काळे, वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे अटकेत
गौरी लंकेश हत्या प्रकरणी अमोल काळे याला मे महिन्यात बंगळुरु एटीएसने अटक केली आहे, तर वीरेंद्र तावडे याला दाभोलकर हत्या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे.
शरद कळसकर हा नालासोपारा स्फोटक प्रकरणात महाराष्ट्र एटीएसच्या हाती लागला. त्यावेळी तपासातच कळसकरचा दाभोलकर हत्येशी संबंध असल्याचे लक्षात आले आणि अधिक चौकशीनंतर त्याचा दाभोलकर हत्येशी थेट संबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याला सीबीआयकडे सोपवण्यात आले. त्यानंतर कळसकरच्या चौकशीत सचिन अंदुरेचे नाव समोर आले. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे मित्र आहेत.
अमोल काळे कोण आहे?
अमोल काळे हा 48 वर्षीय असून, तो पुण्याच्या माणिक कॉलनीतील अक्षय प्लाझातील रहिवासी आहे. पत्नी जागृती, पाच वर्षांचा मुलगा, म्हातारी आई यांच्याबरोबर पुण्यातील घरी अमोल राहत असे. वडिलांचं पानाची दुकान होतं, काही महिन्यांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला. अमोल काळेचं डिप्लोमापर्यंतचं शिक्षण झालं असून, स्पेअर पार्टस पुरवण्याचा धंदा करत होता. कधी कधी धार्मिक पुस्तकांची विक्रीही अमोल काळे करायचा.
कोण आहे वीरेंद्र तावडे?
वीरेंद्र तावडे हा पेशाने डॉक्टर असून, काना, नाक आणि घशाचा तज्ञ आहे. पनवेलमधल्या सनातनच्या आश्रमात तीन वर्षांपासून साधकांची आरोग्यसेवा करतो. 15 वर्षांपासून सनातनचा साधक आहे. वीरेंद्र तावडे सीबीआयच्या ताब्यात आहे.
सचिन अंदुरे कोण आहे?
सचिन अंदुरे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा मित्र आहे. सचिनचे आई-वडील हयात नाहीत. पत्नी आणि एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. सचिन औरंगाबादमधील राजबाजार कुवारफल्ली भागात भाड्याच्या घरात गेल्या 10 महिन्यांपासून राहत होता. निराला बाजार भागात कपड्याच्या दुकानात सचिन काम करतो. 14 ऑगस्ट रोजी एटीएसने सचिन अंदुरेला निरालाबाजार येथून अटक केली. ज्या दिवशी अटक केली, त्या दिवसापासून त्याच्या घराला कुलूप आहे.
शरद कळसकर कोण आहे?
शरद कळसकर मूळचा औरंगाबादमधील केसापुरीचा रहिवासी आहे. औरंगाबादच्या विवेकानंद महाविद्यालयात बारावीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्याने शिक्षण सोडलं. गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापुरात लेथ मशीनवर काम करत असल्याचं घरी शरदने सांगितले होते. वडिलांकडे सहा एकर शेती आहे. शरदला पुणे, सोलापूर, सातारा, नालासोपाऱ्यात घातपाताच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून, डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केल्याची कबुलीही शरदने दिली आहे.
दाभोलकर हत्या प्रकरणी कोण कोण अटकेत
मुंबईतील माझगाव डॉकमधून अविनाश पवार नावाच्या व्यक्तीला दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी (24 ऑगस्ट) रात्री बेड्या ठोकल्या. स्फोटक प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. याआधी वैभव राऊत (9 ऑगस्ट), शरद कळसकर (10 ऑगस्ट), सुधन्वा गोंधळेकर (10 ऑगस्ट) आणि श्रीकांत पांगारकर (18 ऑगस्ट) यांना अटक करण्यात आली होती.
संबंधित बातम्या
नालासोपारा स्फोटकं: आव्हाडांसह चौघे हिट लिस्टवर होते: एटीएस
नालासोपारा स्फोटकांप्रकरणी पाचवी अटक, मुंबईतून एकाला बेड्या
अमोल काळे, वीरेंद्र तावडे हेच दाभोलकरांच्या हत्येचे मास्टरमाईंड : सीबीआय
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयच्या पहिल्या आरोपपत्रावरुन नवा वाद
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : दिवसभरात औरंगाबादमध्ये काय-काय घडलं?
दाभोलकर हत्या : अंदुरेच्या नातेवाईक-मित्राच्या घरातून शस्त्रसाठा जप्त
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या डायरीत आणखी सहा नावं : सूत्र
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपी सचिन अंदुरेला 7 दिवसांची पोलिस कोठडी
नालासोपारा स्फोटक : अविनाश पवारच्या अटकेनंतर सहा दिवस काय केलं? : कोर्ट
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
31 Aug 2018 09:56 PM (IST)
अविनाश पवारला अटक केल्यानंतर तुम्ही सहा दिवस केलंत तरी काय? असा सवाल एटीएसला न्यायाधीश विनोद पाडळकर यांनी विचारला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -