मुंबई : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी हायकोर्टानं 22 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली. मात्र तोपर्यंत त्यांना अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे.


14 आणि 18 फेब्रुवारीला पुणे पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे हायकोर्टाचे निर्देश दिले आहेत. यादरम्यान पोलिसांनी त्यांना अटक केल्यास एक लाखाच्या जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.


भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांशी वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा संबंध आहे, अशा आरोपाखाली पुणे पोलिसांनी ऑगस्ट 2018 मध्ये काहींवर अटकेची कारवाई केली होती. या प्रकरणात तेलतुंबडे यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. 1 फेब्रुवारीला पुणे सत्र न्यायलयानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तेलतुंबडे यांना 2 फेब्रुवारीला पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळावरुन पुणे पोलिसांनी अटक केली होती.


मात्र सर्वोच्च न्यायालयाने 11 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा दिलेला असल्याने ही अटक बेकायदेशीर ठरवल्याने पुणे सत्र न्यायालयाने त्यांची मुक्तता केली होती. त्यावर अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.


या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा पुणे पोलिसांनी या अर्जाला विरोध करत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत नुकतीच मिळाल्याची माहिती तेलतुंबडे यांच्यावतीने कोर्टाला दिली गेली. तसेच याबाबत दोन दिवसाची मुदतवाढ न्यायालयाकडे मागितली. त्यानुसार हायकोर्टानं ही सुनावणी 22 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.