मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने निवडणुकीच्या प्रचाराच्या कार्यक्रमांची आखणी केली आहे. 11 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत राज्यभरात भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.


राज्यात मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी विविध मोहिमा राबवण्यासाठी प्रचार यंत्रणा सज्ज झाली आहे. आज दीनदयाळ उपाध्याय स्मृती दिनानिमित्त 'समर्पण दिवस'च्या माध्यमातून प्रचार मोहिमेची सुरुवात होणार आहे.


कशी असेल भाजपची प्रचार रणनीती ?


11 फेब्रुवारी - 'समर्पण दिवस'


नमो अॅपच्या माध्यमातून भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधी ते बूथ लेव्हल कार्यकर्त्यांपर्यंत पक्षासाठी किमान 50 रुपये आर्थिक योगदान करणे आवश्यक असेल. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह स्वतः समर्पण करुन या मोहिमेचा शुभारंभ करतील. आर्थिक समर्पण करुन सर्वांनी याचं ट्वीट करायचं आहे.


12 फेब्रुवारी ते 2 मार्च - 'मेरा परिवार, भाजप परिवार'


भाजपच्या प्रत्येक सदस्याने घरावर भाजपचा झेंडा आणि स्टिकर लावायचा आहे. हॅशटॅग #MeraParivarBhajapaParivar या नावाने फेसबुक लाईव्ह आणि ट्वीट करायचं आहे. 12 फेब्रुवारीला मुख्यमंत्री भाजप कार्यालयावर आणि प्रदेशाध्यक्ष औरंगाबाद येथे झेंडा फडकावून या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार.


26 फेब्रुवारी - 'कमल ज्योती संपर्क'


भाजप कार्यकर्त्यांनी स्वतःच्या आणि सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरासमोर संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत दीपप्रज्वलन करायचे आहे.


28 फेब्रुवारी - 'संघटन संवाद'

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील बूथ प्रमुखांशी नमो अॅपच्या माध्यमातून थेट संवाद साधणार.


3 मार्च - 'बाईक रॅली'


#BJPVijaySankalpRally या नावाने मंडल स्तरावर बाईक रॅलीचे आयोजन. एकाच वेळी प्रत्येक बूथमधून किमान 5 बाईक घेऊन निघणार. भाजपचे झेंडे आणि मोदींचा मास्क घालून शहरात 30 ते 60 किमी तर ग्रामीण भागात 150 किमी रॅली काढली जाईल.


पुढील महिनाभर शासकीय जिल्हास्थानी बुद्धिजीवी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या केंद्रस्थानी प्रमुख वक्त्यांसह केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत समाजातील विविध घटकांशी संवाद साधतील.