Mumbai Rain News : आज राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत आहे. सध्या मुंबईसह (Mumbai) परिसरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर वाढल्यानं लोकलच्या वाहतुकीवर परिणाम (Impact on local Train Services) झालाय. तीनही मार्गांवरची वाहतूक उशिराने सुरु आहे. तर पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.


दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला


मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम व मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे मुंबईतील काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे कुर्ल्यातील सखल भागात पाणी भरण्याची शक्यता आहे. लोकल मार्गाच्या बाजूला असलेला नाला भरुन वाहतोय, त्यामुळे पाऊस असाच राहिला तर वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.  मुंबईत दोन दिवस पावसानं उसंत घेतली होती. मात्र, आज पुन्हा पावसाने  जोर धरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 


 दादर, वरळी, वांद्रे या पश्चिम उपनगरांमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता


दरम्यान, हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत मुंबईसह परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्यामुळं अनेक भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. कारण पाऊस किमान पुढील 24 ते 26 तासांपर्यंत सतत मध्यम ते मुसळधार असण्याची शक्यता आहे. दादर, वरळी, वांद्रे या पश्चिम उपनगरांमध्ये सर्वाधिक पाऊस पडेल असा अंदाज आहे. पश्चिमेकडील वारे कोकण किनारपट्टीवर योग्य आर्द्रतेसह संरेखित झाल्यामुळे मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.


राज्याच्या विविध भागात आज ऑरेंज अलर्ट जारी


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकणातील रायगड आमि रत्नागिरी या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिकसह पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


महत्वाच्या बातम्या:


मुंबईकरांनो सावधान! आज अतिमुसळधार पावसाचा इशारा, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, हवामान विभागाचा अंदाज काय?