मुंबई : निवडणूक निकालानंतर ईव्हीएम (EVM) मशिनचा वाद काही नवा नाही. ईव्हीएम मशिनमध्ये घोळ असल्याचा आरोप सातत्याने पराभूत उमेदवारांच्या पक्षातील काही समर्थकांकडून केला जातो. विशेष म्हणजे अनेकदा राजकीय पक्षांच्या प्रमुखांकडूनही ईव्हीएम मशिन्सऐवजी बॅलोट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणीही केली जाते. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर मुंबईतील शिवसेना (Shivsena) महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या विजयानंतरही असाच ईव्हीएमवर संशय घेऊन वाद निर्माण झाला होता. त्यामुळे, ईव्हीएमबाबत खोट्या, एकतर्फी, आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेवत काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युट्यूबर ध्रुव राठी यांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 


काँग्रेस नेते आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शिवसेना नेते उद्धव ठाकरे,संजय राऊत यांच्यासह ध्रुव राठीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या सर्वांनी माध्यमांत ईव्हीएम मशिन्सबाबत अनाठाई प्रतिक्रिया दिल्याबद्दल एसआयटीमार्फत चौकशीची करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्याकाळात मोबाईल ओटीपीद्वारे इव्हीएम मशिन हॅक केल्याच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, यु-टयुबर ध्रुव राठी आणि इतरांविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.  न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी ही याचिका सुनावणीसाठी आली. मात्र, याचिकाकर्त्यांचे वकील नीलेश ओझा यांनी या खंडपीठासमोर ही याचिका चुकून सूचीबद्ध केल्याचे स्पष्ट करताच खंडपीठानं हायकोर्ट रजिस्ट्रीला याचिका योग्य खंडपीठासमोर ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.


काय आहे याचिका 


निवडणूक आयोग तसेच मुंबई पोलिसांनी ईव्हीएम मशीन हॅक करता येऊ शकत नाही, असं स्पष्ट केलेलं आहे. मात्र, तरीही याचिकेतील प्रतिवाद्यांनी खोट्या, एकतर्फी, आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रकाशित केल्या, असा आरोप करत भांडुप येथील इंडियन लॉयर्स अँड ह्युमन राइट्स ॲक्टिव्हिस्ट असोसिएशनच्यावतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे. हे एक षड्यंत्र असून चुकीची माहिती पसरवल्याबद्दल आरोपींविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी. तसेच, याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापना करण्याची मागणीही याचिकेतून केली गेली आहे. 


एक्स, गुगल, यु ट्युब, इंस्टाग्राम आणि फेसबूकसारख्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या बातम्यांशी संबंधित पोस्ट तात्काळ काढून टाकण्याचे आदेशही प्रतिवाद्यांना द्यावेत. ज्या वृत्तपत्रानं यावर लेख प्रकाशित केले आहेत. त्या वृत्तपत्रावरही कारवाई करावी, अशा या मागण्या या याचिकेतून करण्यात आलेल्या आहेत.


काय आहे प्रकरण 


शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र वायकर यांनी वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अवघ्या 48 मतांच्या फरकानं ठाकरे गटाच्या अमोल किर्तिकरांवर विजय मळवला. मात्र, मतमोजणी केंद्रात सोबत फोन ठेवण्याची परवानगी नसतानाही वायकर यांच्या एका नातेवाईकानं फोन वापरल्याचा आणि त्या फोनवरून ईव्हीएम उघडण्याचा ओटीपीसाठी वापरला होता, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. मुळात, ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कधीही ओटीपी वापरला जात नाही अथवा ईव्हीएम प्रोग्रामेबल नसल्याबद्दल निवडणूक आयोग तसेच मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही याविरोधात एका मराठी आणि इंग्रजी दैनिकानं खोडसाळ वृत्त प्रसिद्ध केलं होतं.


हेही वाचा


बीडच्या हुंकार सभेत मनोज जरांगेंचा मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल; भुजबळांना म्हणाले, एका बुक्कीत दात पाडीन