मुंबई :  एकीकडे राज्यावर उष्णतेच्या लाटेचं (Heatwave) संकट असताना दुसरीकडे वीजेच्या मागणीतही रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे.  मुंबईच्या वीज मागणीने सोमवारी साडे तीन हजार मेगावॅटचा टप्पा पार केला. मुंबईची आजवरची कमाल वीज मागणी एप्रिल 2022 मध्ये 3800 मेगावॅटची असली, तरी या मोसमात पहिल्यांदाच साडे तीन हजार मेगावॉटचा टप्पा पार झाला आहे. मागील आठवड्यातील वीजमागणी सरासरी 3200 मेगावॅट दरम्यान असताना सोमवारी 300 मेगावॉटची वाढ दिसली.


 मुंबईची वीजमागणी सहसा सरासरी 2400 ते 2600 मेगावॅट दरम्यान असते. कोरोना संकटानंतर ही सरासरी 2800 ते तीन हजार मेगावॅटच्या घरात गेली. तर मागील उन्हाळ्यात सरासरी 3200 ते 3300 मेगावॅट दरम्यान होती. यंदा मात्र मार्चमध्ये ऊन तापू लागल्यापासून सातत्याने मुंबईची वीजमागणी तीन हजार मेगावॅटच्या वरच आहे. सोमवारी दुपारी 2.40 वाजता मागणीने 3532 मेगावॉटचा उच्चांक गाठला. 


पूर्वेकडून आलेल्या उष्ण वाऱ्यांनी मुंबईला तीव्र चटके देण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी तापमानाची कमाल आणि किमान पातळी सरासरीपेक्षा थेट तीन ते चार अंशांनी वाढली. मुंबईत सोमवारी कमाल तापमान 37 तर किमान तापमान 26 अंशांवर गेलं होतं. त्यामुळे मुंबईकरांची दुपारी उन्हातून चालताना प्रचंड दमछाक झाली.  आज आणि उद्या तर पारा 39 ते 40 पर्यंत पोहोचेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ठाणे, रायगड, पालघर या जिह्यांनाही उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.


दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिना अधिक उष्ण राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.  एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णता राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मात्र सरासरी एप्रिल ते जून महिन्याचा विचार केला तर महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी राहण्याचा अंदाज आहे.  


उष्णता वाढली, काय घ्याल काळजी?


दुपारच्या वेळी घराबाहेर जाणं टाळावे. जास्तीत जास्त पाणी प्यावे. जर उन्हाळ्यात शरिराचे तापमान सतत वाढत असेल, डोके दुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा निराशपणा जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जावे. उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ आणि अति उष्णता असल्यानंतर जेवण तयार करु नका. विशेष करुन दुपारी 12 ते दुपारी 3 या दरम्यान घराबाहेर उन्हात जाऊ नका.सतत पाणी पीत राहा जेणेकरुन शरीर हायड्रेट राहिल. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ओआरएस) याचा वापर करा. त्याशिवाय घरात तयार केलेले लिंबू-पाणी, छास, लस्सी, ज्यूस याचं जास्तीत जास्त सेवन करा. घरातून दुपारच्या वेळी बाहेर येऊ नका. टरबूज, कलिंगड, संत्रा यासारख्या फळांचं सेवन करा. तसेच सुती कपडे परिधान करा. गडद रंगाचे कपडे परिधान करु नका. उन्हात जाताना डोकं झाका म्हणजे उन्हापासून बचाव होईल.