अमरावती : अमरावतीच्या चांदूर बाजार ते वलगाव रोड रुंदीकरण किंवा परिसर सौंदर्यीकरण अशा कारणा करिता या परिसरातील भले मोठे कडूलिंबाचे रस्त्याच्या कडेला असलेले झाडे तोडण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे सर्व मजूर मशीन्स घेऊन झाडं तोडण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. इतर झाडं आधीपासूनच तोडून झाली होती. फक्त या चौकातील झाडं तोडणं बाकी होतं. त्यासाठी मजूरांची लगबग सुरु होती. परंतु, झाड तोडण्यासाठी गेल्यानंतर तेथील झाडावर दुर्मिळ होत चाललेल्या पंढऱ्या मानेच्या करकोच्याचे घरटे दिसले. झाड तोडलं तर त्या पक्षाचं घरटं विस्कळीत होईल. तसेच जुलै महिन्यात हा पक्षी अंडी देतो. त्यामुळे झाडावरील घरट्यात अंडी असल्याचं नाकारता येत नव्हतं. ही बाब शिवा काळे यांच्या लक्षात आली . त्यानंतर त्यांनी झाड तोडणाऱ्या ठेकेदाराकडे विचारपूस केली असता त्याने झाडं तोडणाऱ्या ठेकेदाराला विचारपूस केली. त्याने परवानगी असल्याचं सांगितलं. तसेच, ही साईट दोन दिवसांत क्लिअर करायला सांगितलं आहे, असंही सांगितलं.



सरकारी कामात आपला अळथळा नको म्हणून थेट चांदूरबाजारचे तहसीलदार जगताप यांना फोन वरून संपर्क साधत सदर बाब सविस्तर सांगितली. त्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता योग्य मार्गे त्या पक्षाच्या घरट्याला वाचवण्यासाठी संबंधित विभागाला संपर्क केला.



वनविभागाचे लोखंडे यांनी लगेच वनविभागाचे कर्मचारी त्या ठिकाणावर पाठवून स्थळ परीक्षण अहवाल मागविला. या कालावधीत स्थानिक लोक या ठिकाणी येऊ लागले. मागील दोन वर्षांपासून या पक्षांचे वास्तव्य या ठिकाणी असल्यामुळे ते या चौकाच्या परीचयाचेच झाले होते. सर्व लोक आता तो पक्षी या ठिकाणी राहणार नाही, म्हणून हळहळत होते. याच दरम्यान पर्यावरण संदर्भात काम करणाऱ्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे प्रफुल्ल रुईकर, अनुप रघुवंशी, श्रेयश चडोकार, नितीन मांडवकर, गौरव केचे त्या ठिकाणी पोहचले परिस्थितीचे गांभीर्य पाहून महावितरणाने
आज झाडे न तोडता उद्या झाडे तोडा असे सुचवत त्या दिवशी विद्युत पुरवठा खंडित न करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले.


स्थळ परीक्षण करण्यासाठी झाडावर चढून घरट्याचे फोटो घेऊन त्यात नेमके अंडी आहेत की, पिल्लं आहेत, हे बघून तसा अहवाल वरिष्टांना पोहचवायचा असल्या कारणाने झाडावर चढण्याचे आव्हान पुढे असताना स्वराज्य सेवा प्रतिष्टानच्या विनंतीला मान देऊन राहून ढवळे यांनी त्यांचा ड्रोन कॅमेरा उपलब्ध करून सदर घरट्यांचा व्हिडीओ आणि फोटो काढले. ते सर्व फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर तीन अंडी आणि एक पिल्लू असल्याचं स्पष्ट झालं. ही बाब प्राणी मित्र विशाल बनसोड यांना स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आली. त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत बोलून घटनेचे गांभिर्य सांगितले. भेंडे यांनी लगेच चांदुर बाजार येथील बांधकाम विभागाचे अभियंता बोबडे यांना मोक्यावर जाऊन त्या पक्षाच्या घरट्याला वाचवण्यासाठी उपाययोजना कशा करता येईल याबद्दल सकारात्मक निर्णय घेऊन काम करायचे निर्देश दिले.


रविवार सुटी असल्यामुळे सोमवारी वनअधिकारी आणि बांधकाम अधिकारी यांच्या संगनमताने बांधकाम विभागाने त्या पक्ष्याच्या पिलांचे पालकत्व स्वीकारून जोपर्यंत त्या पक्षाची पिल्लं मोठी होऊन उडून जात नाही, तोपर्यंत ते झाड न कापता बाकीचे काम सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहेच, शिवाय संपूर्ण भारतात नवीन संदेश देणाराही आहे. या निर्णयामुळे बांधकाम विभागाचे सगळीकडे भरभरून कौतुक तर होत आहेच. शिवाय पांढऱ्या मानेचा करकोचा या दुर्मिळ पक्षाच्या घरट्याला वाचवण्या करिता धावून येणाऱ्या प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांचे स्वराज्य सेवा प्रतिष्ठाना तर्फे आभार मानण्यात आले.