मुंबई : भीमा कोरेगाव दंगल आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने शुक्रवारी हा निकाल जाहीर केला. मात्र तेलतुंबडे यांचे वकील मिहीर देसाई यांच्या विनंतीवरुन सर्वोच्च न्यायालयात या निकालाविरोधात दाद मागण्यासाठी अवधी आणि तोपर्यंत सध्या दिलेला अटकेपासूनचा दिलासा कायम ठेवण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार हायकोर्टाने तेलतुंबडे यांना तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.


शहरी नक्षलवाद प्रकरणी पुणे पोलिसांनी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्यासह अन्य 21 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरु असून यातील अनेकांना अटकही करण्यात आली आहे.

आनंद तेलतुंबडे हे सध्या गोव्यातील एका शैक्षणिक संस्थेत सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 28 ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी तेलतुंबडे यांच्या पुण्यातील घरावर छापा मारला होता. मात्र त्यांना ते तिथे सापडले नाहीत. सरकारी वकिलांनी तो छापा नसून केवळ औपचारिक भेट असल्याचं हायकोर्टात सांगितलं होतं. सध्या त्यांच्या अटकेची आवश्यकता नसली तरीही दाखल गुन्ह्यातून त्यांचं नाव वगळण्यास मात्र राज्य सरकारनं हायकोर्टात जोरदार विरोध केला होता.

कॉम्रेड प्रकाश यांच्याकडे सापडलेली पत्रं आणि रोना विल्सन यांच्या लॅपटॉपमधील डेटा यांच्यावरुन तेलतुंबडे आणि इतर सर्वांविरुद्ध पुरेसे पुरावे सापडल्याचं राज्य सरकारनं हायकोर्टात म्हटलं आहे. आनंद तेलतुंबडे यांचे बंधू मिलिंद तेलतुंडबे यांना 'कॉम्रेड एम' या नावानं संबोधलं जात असल्याचंही यात म्हटलं आहे. मिलिंद तेलतुंबडे हे या केसमध्ये वॉन्टेड आहेत. मात्र आनंद तेलतुंबडे यांचा त्यांच्या भावाशी गेली 26 वर्ष कोणताही संपर्क नसल्याचा दावा करण्यात आला आहे.