BMC : मुंबई महापालिकेतर्फे सुरू असलेल्या पवई तलावालगतच्या सायकल ट्रॅक उभारणीच्या बांधकामाला मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे. खारफुटीच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या या सायकल ट्रॅकचं काम थांबवण्यात यावं यासाठी मुंबई उच्च न्यायालयात आयआयटी पवईतील दोन विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली आहे. न्यायालयानं या याचिकेची दखल घेत या बांधकामाला 18 नोव्हेंबरर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे.


मुंबई पालिकेमार्फत पवई तलाव परिसराचा विकास करण्यात येणार असून तलावालगत सायकल, जॉगिंग ट्रॅक व सुशोभीकरण केलं जाणार आहे. या कामाला सुरुवातही करण्यात आली होती. मात्र हा ट्रॅक खारफुटीच्या जागेवर बांधण्यात येत असून त्यासाठी तलावात भराव टाकला जाणार आहे. तसेच या कामात इथली काही झाडंही तोडली जाणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होईल, असा दावा करत ओमकार सुपेकर व अभिषेक त्रिपाठी या पीएचडी करणाऱ्या आयआयटीतील दोघा विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. राजमनी वर्मा यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुटीकालीन न्यायालयात न्यायमूर्ती न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. 


त्यावेळी याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाला सांगितलं की, पवई तलावात अनेक झाडं आहेत. तिथे विविध प्रजातीचे पक्षीही आहेत. याशिवाय तलावात मगर, कासव व विविध जलचरांचही अस्तित्वात आहे. सायकल ट्रॅकसाठी त्या ठिकाणी भराव टाकला जाणार आहे. तसेच झाडंही तोडली जाणार आहेत. 


नैसर्गिक हानी करून कोणतंही बांधकाम केलं जाणार नाही असा पालिकेच्यावतीनं वकील अस्पी चिनॉय यांनी युक्तिवाद केला. त्यांनी हायकोर्टाला सांगितलं की, सदर जागा ही मुळात खारफुटीचीच नाही. न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत तूर्तास या कामाला स्थगिती दिली आहे. तसेच राज्य सरकारची बाजू मांडणाऱ्या ऍड ज्योती चव्हाण यांना या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत सुनावणी 18 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.


महत्वाच्या बातम्या :