मुंबई : आर्यन खान प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी 25 कोटी रुपयांची डील केल्याचा आरोप प्रभाकर साईल याने केला होता. या आरोपाची दखल एनसीबीने गंभीरपणे घेतली असून मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची चौकशी सुरु केली आहे. एनसीबीच्या टीमने आज तब्बल चार तास समीर वानखेडेंची चौकशी केली असून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातही समीर वानखेडेंची चौकशी करण्यात आली होती. 


एनसीबीने समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्या प्रभाकर साईल यालाही चौकशीसाठी बोलावलं होतं. पण त्याने अद्याप कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचं एनसीबीच्या व्हिजिलंन्स टीमचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं. चौकशी झाल्यानंतर समीर वानखेडेंनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 


काय आहेत समीर वानखेडे यांच्यावर आरोप? 
या प्रकरणातील पंच असलेल्या किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने किरण गोसावी आणि समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. मुंबई ड्रग केस प्रकरणात सेटलमेंटसाठी एनसीबीकडून 25 कोटींची मागणी करण्यात आल्याचा दावा त्याने केला होता. त्यानंतर 18 कोटी रुपयांची डील फायनल होणार होती. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, त्यातील 8 कोटी रुपये एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना देण्यात येणार असल्याचा गंभीर आरोप प्रभाकर साईलने केला होता. किरण गोसावी पेशानं गुप्तहेर आहे आणि ड्रग्ज केस प्रकरणातील पंचही आहे. प्रभाकर सईलनं माध्यमांसमोर येऊन केलेल्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर किरण गोसावी फरार झाला होता. सध्या तो पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे.


दरम्यान, मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात सेटलमेंट करण्यासाठी एनसीबीने 25 कोटींची मागणी केल्याचा दावा करणाऱ्या प्रभाकर साईलनं मुंबई पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आहे.


काही दिवसांपूर्वीच नवाब मलिकांनी दावा केला होता की, समीर वानखेडे आणि त्यांचं कुटुंब मुस्लिम आहेत. तसेच समीर वानखेडे यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खोटी प्रमाणपत्र सादर केली. दरम्यान, नवाब मलिकांनी केलेले सर्व आरोप समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी फेटाळून लावले.


महत्वाच्या बातम्या :