Mumbai Coronavirus Update : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही कोरोनाच्या प्रादुर्भावात काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट झालेली पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील कोरोनाचा साप्ताहिक ग्रोथ रेट कमी होऊन ०.०4 टक्केंवर आला आहे. दोन महिन्यांपूर्वी मुंबईचा ग्रोथ रेट 0.06 टक्केंवर पोहचला होता. तसेच रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही 1556 दिवसांवर पोहचला आहे. शहरात झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये एकही कंटेनमेंट झोन नाही. मुंबईतील ॲक्टिव्ह कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णांची संख्याही चार हजारांपेक्षा कमी झाली आहे.  गेल्या काही दिवसांपासून शहरात लसीकरणाला वेग आला आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांचं लसीकरण होत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. सध्या मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही. मात्र, 35 इमारती अद्यापही सील करण्यात आल्या आहेत. 

Continues below advertisement


मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईत 301 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 463  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या कालावधीत तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत 7,32,889 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्केंवर पोहचला आहे.





मुंबईतील 10 हजार सोसायट्या 'फुल्ली वॅक्सिनेटेड' 
मुंबईतील 10 हजार सोसायट्या लसवंत (Fully Vaccinated) झाल्या असून 10 हजार इमारतीतील रहिवाशांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. या इमारतींवर महापालिकेकडून विशेष लोगो लावला जातोय. मुंबईतील 100 टक्के लसीकरण झालेल्या इमारतींवर 'फुल्ली वॅक्सिनेटेड' असा लोगो लावण्यात येणार आहे.  येत्या जानेवारीपर्यंत संपूर्ण मुंबई लसवंत होणार असल्याचा सत्ताधारी शिवसेनेचा दावा आहे. अशातच मुंबईत एकूण 37 हजार इमारती आहेत. त्यापैकी 22 हजार इमारतींच्या सोसायट्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 10 हजार इमारती संपूर्ण लसवंत झाल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या (BMC) वतीनं देण्यात आली आहे. 
 
राज्यात 1130 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
शनिवारी राज्यात 1130 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 49 हजार 186 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.57 टक्के आहे. राज्यात आज 26 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.