मुंबई : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर आज सोनेखरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. अक्षय्य तृतीयेनिमीत्त सराफ बाजारात लगबग पाहायला मिळाली. जळगाव, मुंबई, पुण्यासह राज्यभरातून सोने खरेदीची मागणी आहे. मात्र पारंपारिक सोने खरेदीची परंपरा बाजूला सारुन ग्राहक ऑनलाइन बाजारात सोने खरेदीसाठी अधिक उत्साही असल्याचे दिसून आले आहे.


ऑगमंट या सोनेखरेदी-विक्री करणाऱ्या अॅपद्वारे ऑनलाईन सोने खरेदीची ऑफर दिली जात आहे. तुम्ही जितक्या वजनाचं सोनं घ्याल तितक्याच वजनाची चांदी तुम्हांला फ्री मिळणार आहे. यामुळेच ऑनलाईन सोने खरेदी-विक्रीचा नवा ट्रेंड आता बाजारात रुळत चालला आहे.

अवघ्या काही महिन्यांत एक लाखांहून अधिक लोकांनी ऑगमाँट या अॅपव्दारे लाखों रुपयांचे सोने खरेदी केल्याचे विक्रेते सांगत आहेत. यात दाक्षिणात्य राज्य अग्रेसर असून दिवसाला सहा किलो सोन्याची विक्री होत आहे. ऑनलाइन बाजारात सर्वसामान्य ग्राहकांकडून एक ते पाच ग्रँम पर्यंतच्या नाण्यांना सर्वाधिक मागणी असल्याचे ऑगमाँटचे संचालक सचिन कोठारी यांनी सांगितले.

पारंपारिक सराफ बाजारासोबतच ऑनलाईन सराफ बाजारात सोने खरेदी करण्याकडेही लोकांचा कल यावेळी पाहायला मिळाला. अगदी एका रुपयापासून सोनेखरेदीची संधी मिळतेय. त्यामुळे, मोठ्या गुंतवणूकीसाठी पुरेसे पैसे नसले तरी तुम्ही सणासुदीला सोनं नक्की विकत घेऊ शकता.

VIDEO | अक्षय्य तृतीयेनिमित्त उद्यान बाप्पाला 2100 आंब्यांची आरास | मुंबई | एबीपी माझा



जळगावच्या सुवर्ण नगरीत सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

साडेतीन मुहर्ता पैकी एक प्रमुख शुभ मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचा सण मानला जातो, या दिवसाच्या निमित्ताने जळगावच्या सुवर्ण नगरीत मोठ्या प्रमाणावर सोने खरेदीसाठी ग्राहक गर्दी करताना पाहायला मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यात या दिवसाच्या निमित्ताने सोने खरेदीची अनेक वर्षांची परंपरा आहे या परंपरेनुसार आज जळगावच्या सुवर्ण नगरीत सकाळपासूनच सोने खरेदी साठी ग्राहक गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या दिवसाची खरेदी ही शुभ आणि भरभराट देणारी असल्याची धारणा ग्राहकांची आहे.

जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याचा भाव आज 32100 रुपये इतका कमी असल्याने ग्राहक खरेदीला चांगला प्रतीसाद मिळेल असा विश्वास सोने व्यावसायिकांना आहे.