Hasan Mushrif, Mumbai : "शाहू महाराज (Shahu Maharaj) आमच्यासाठी आदर्श आहेत, त्यांनी निवडणूक लढवू नये. आम्ही त्यांना याबाबत विनंती देखील केली आहे. कारण जनतेची तशी इच्छा आहे की, शाहू महाराज यांनी निवडणूक लढवू नये",असे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) म्हणाले. हसन मुश्रीफ यांनी मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
कोल्हापूरच्या जागेबाबत चर्चा होणार
हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूरच्या जागेबाबत आज (दि.5) आमच्या बैठकीत चर्चा होईल. लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पक्षाने जाहीर केली आहे. महाराष्ट्राची जाहीर झाली नाही कारण तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसल्याशिवाय ते होणार नाही. आज अमित शाह साहेब येतील. दोन्ही पक्षांचे नेतेमंडळी चर्चा करतील. ते निर्णय घेतील. त्याप्रमाणे जागा वाटप झाले की उमेदवारांची निवड होईल.
'मविआ'कडून कोल्हापूरच्या जागेचा तिढा सुटला
महाविकास आघाडीकडून कोल्हापूरची जागा शरद पवार गटाला देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटाने कोल्हापूरची जागा शरद पवार गटाला सोडण्यास सहमती दर्शवली आहे. या जागेच्या बदल्यात काँग्रेसकडून सांगलीची जागा शिवसेनेला देण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. शाहू महाराज कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार झाले तर मला आनंदचं होईल, असे शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर शाहू महाराजचं महाविकास आघाडीचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
संभाजीराजेही होते लोकसभेसाठी इच्छुक
शाहू महाराज यांचे पुत्र संभाजीराजे छत्रपती यांनी यापूर्वी कोल्हापूर लोकसभेची जागा लढवण्याची इच्छा दर्शवली होती. कोल्हापूरची जागा आमच्यासाठी सोडावी, स्वराज्य पक्षाकडून आपण ही निवडणूक लढवू, असा प्रस्ताव संभाजीराजे यांनी ठेवला होता. मात्र, तो मागे पडला. त्यानंतर महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगू लागल्या.
मुश्रीफ पुढे बोलताना म्हणाले, आमचं काय चाललय हे पाहण्यापेक्षा त्यांनी त्यांचं पाहावं. निवडणूका तोंडावर आल्यात. आता आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे त्यांनी स्वत:चं बघावं एवढी आमची विनंती त्यांना आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रायगडचे खासदार आहेत. तरीही त्या मतदारसंघाच्या जागावाटपाबाबत चर्चा का होते? असा सवाल मुश्रीफ यांनी विचारला आहे.
मुश्रीफ यांच्याकडून दत्ता भरणेंची पाठराखण
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. त्यावर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दत्ता मामा भरणे यांनी धमकी दिली ही चुकीची माहिती आहे. दत्तामामा भरणे आणि त्यांचे कार्यकर्ते अशा पद्धतीची धमकी देणार नाही कारण त्यांचा तसा स्वभाव नाही, असं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.
इतर महत्वाच्या बातम्या