मुंबई : मढ परिसरातील मिलेनियर आणि एक्स्प्रेशन या दोन स्टुडिओंवर पालिकेच्या पी/ उत्तर विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई करून स्टुडिओ जमीनदोस्त केल्या आहेत. या कारवाईनंतर आता मढ परिसरातील स्टुडिओ चालकांचे धाबे दणाणले आहेत. फिल्म इंडस्ट्रीतील महत्त्वाचा भाग असलेल्या या स्टुडिओबाबत होणारे आरोप आणि कारवाई यांमुळे मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीची चाकं परराज्यात वळवली जात आहेत का? असा सवाल विचारला जात आहे.


मालाडपासून जवळ असणाऱ्या समुद्र  किना-यावर  वसलेला मालाड, मढ, मार्वे, एरंगळ, भाटी हा प्रदेश या भागात छोट्या वाड्या, वस्त्या आहेत.  बिच, रिसॉर्ट, स्टुडिओ यामुळे  पर्यटकांची येथे कायम वर्दळ असते. या भागात तब्बल  49 बेकायदेशीर स्टुडिओ असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला. इतकंच नाही तर याला स्थानिक आमदार आणि माजी मंत्री अस्लम शेखांचा आशिर्वाद असल्याचाही आरोप झाला. आरोपांनंतर पालिका सक्रिय झाली. चौकशी समिती नेमली गेली आणि काल अखेरीस दोन स्टुडिओवर पालिकेचा हातोडा चालला. या कारवाईमुळे मढ मालवणी परिसरातील सीआरझेडचं उल्लंघन करणाऱ्या बेकायदेशीर  स्टुडिओवर वरदहस्त नेमका कुणाचा याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. पालिकेनं काल मिलेनीअर आणि एक्सप्रेशन या दोन स्टुडीओवर  कारवाई केली. मात्र, किरीट सोमय्या दावा करत असलेले 49 नेमके स्टुडिओ कोणते याचा शोध घेतला. किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर पालिका डिएमसी यांच्या अंतर्गत चौकशी समिती गठीत करण्यात आली. चौकशी समितीनं प्रामुख्यानं मढ परिसरातील पाच स्टुडिओ चौकशीच्यादृष्टीनं तपासायला घेतले


मढमधले पालिकेच्या रडारवर असलेले स्टुडीओ कोणते?



  • मिलेनिअर स्टुडीओ - हातोडा चालला

  • एक्सप्रेशन स्टुडीओ- हातोडा चालला 

  • बालाजी तिरुपती सिनेमा - कोर्टात प्रकरण प्रलंबीत 

  • भाटीया बॉलिवूड - पालिकेच्या नोटीसनंतर स्वत:हून सेट काढून घेतला 

  • वृंदावन एन्टटरेनमेंट - सीआरझेड परिसरात हा स्टुडीओ येत नाही. इतर बाबींची चौकशी सुरु


याव्यतिरीक्त असलेल्या 44  चित्रिकरणाच्या जागा या बंगले आणि इतर जागा आहेत. याची  देखील चौकशी महापालिका करणार आहे 


वास्तविक, 2016 मध्ये मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्याकरता स्टुडिओला सहा महिन्यांची तात्पुरती परवानगी देणारे परिपत्रक तत्कालिन आयुक्त अजॉय मेहतांकडून काढण्यात आले. मात्र, सदर परवानगी दर सहा महिन्यांनी सीआरझेडच्या परवानगीसह नव्यानं घेणं अपेक्षित होतं. एका स्टुडिओतून परवानगीनंतर पालिकेला 20 लाखांपर्यंतचा महसूल मिळतो. मात्र, स्टुडिओ चालकांनी सीआरझेड परवानगीचे दर सहा महिन्यांनी नुतनीकरण न करताच स्टुडिओ सुरु ठेवले. यामुळे, नव्यानं पर्यावरण विभाग आणि सीआरझेडची परवानगी सादर करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशाराच पालिकेनं दिला आहे


सर्वात महत्वाचे म्हणजे या स्टुडिओंना तात्पुरते शेड आणि सेट बनवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. याशिवाय, अग्निरोधक यंत्रणा असणे, परवानगीनुसार सीआरझेड दोन किंवा तीन मध्येच तात्पुरत्या स्वरुपाचे बांधकाम करणे बंधनकारक होते. तसेच केले जाणारे बांधकाम इको फ्रेंडली असणं बंधनकारक होते. मात्र या नियमांचंही उल्लंघन झालं. 


लाल सिंग चढ्ढा, शमशेरा, पृथ्वीराज चव्हाण, आदिपुरुष अशा अनेक सिनेमांचं शूटिंग झालंय.  नुकत्याच रिलीज झालेल्या  ब्रम्हास्त्र सिनेमातलं गाणं चित्रीत झालं. अमिताभ बच्चनपासून  रणबीर कपूर, रणवीर सिंह, सैफ अली खान, आलिया भट , माधुरी दीक्षित ,कटरिना कैफ, श्रद्धा कपूर यांसारख्या अनेक दिग्गजांनी इथे शूटिंग केलं आहे. त्यामुळे पालिकेच्या या कारवाईमुळे मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीची चाकं परराज्यात वळवली जातायत का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जातोय.