Uddhav Thackeray Sharad Pawar :  पंतप्रधानपदासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून चर्चेत आणले जाते. तर, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याही नावाची चर्चा सुरू असते. आज उद्धव ठाकरे यांच्या भाषणाच्या वेळी एका उत्साही कार्यकर्त्याने देश का नेता कैसा हो...शरद पवार जैसा हो... अशी घोषणा दिली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी हरकत नसल्याचे म्हटले. आज मुंबईत महाविकास आघाडीच्याा (Maha Vikas Aghadi) प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे संबोधित करत असताना हा प्रकार घडला. 


राज्यात पहिल्यांदाच महाविकास आघाडीची संयुक्तपणे सभा आयोजित करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे स्थापन झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि आघाडीतील इतर पक्षांच्यावतीने या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या आयोजनाच्या अनुषंगाने मुंबई बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी संबोधित केले. 


यावेळी उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मविआच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, स्थानिक पातळीवरदेखील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढणार असू तर सर्वांनी शपथ घेतली पाहिजे. आपल्या पक्षाच्या पदरात काही पडले नाही तरी चालेल. पण,  ग्रामपंचायत निवडणूक असो किंवा सोसायटीची निवडणूक असो...भाजप आणि मिंदे गटासोबत कोणती युती करणार नाही हे ठरवावे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 


उद्धव यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात उपस्थित असलेल्या एका कार्यकर्त्याने देशा का नेता कैसा हो...शरद पवार जैसा हो अशी घोषणा दिली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी तात्काळ उत्तर देत काही हरकत नाही...पण त्यासाठी एकत्र येऊन लढा असे आवाहन केले. नाहीतर पुन्हा पायात पाय घालून आपण पडू...घोषणा देणारे आणि आपण इथेच थांबू अशी मिश्किल टिप्पणी ठाकरे यांनी केली. पंतप्रधानपद हे खूप मोठं स्वप्न आहे. ग्रामपंचायतीपासून आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचा झेंडा रोवल्यानंतर पुढील प्रवासही सोपा होईल असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 


पाहा व्हिडीओ : Uddhav Thackeray on Sharad Pawar : देश का पंतप्रधान कैसा हो, शरद पवार जैसा हो, ठाकरे म्हणाले...