Guru Maa Kanchan Giri meets Raj Thackeray : अयोध्येच्या साध्वी गुरु माँ कांचनगिरी (Guru Maa Kanchan Giri) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सूर्याचार्यजी देखील उपस्थित होते. या भेटीमुळे महापालिका निवडणुकीआधी मनसेची हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वाटचाल असल्याची चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरेंच्या भेटीआधी गुरु मॉं कांचनगिरी यांनी शिवाजी पार्क इथं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. त्यांच्यासोबत सूर्याचार्यजी देखील उपस्थित होते. राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर गुरु माँ कांचनगिरी यांनी माध्यमांशी संवाद साधत राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा हेतू स्पष्ट केला. तसेच त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर विचारधारा जमत असेल तर मनसेनं भाजपसोबत जावं, असंही म्हटलं आहे. 


राज ठाकरेंच्या भेटीनंतर गुरू माँ कांचनगिरी बोलताना म्हणाल्या की, "हिंदू राष्ट्र बाबत आज आमची राज ठाकरे सोबत चर्चा झाली. उत्तर भारतीयांच्या मुद्यावर सुद्धा चर्चा झाली. राज ठाकरे यांच्या मनात जे उत्तर भारतीयांबाबत होते, त्याबाबत मी त्यांना बोलले. उत्तर भारतीयांवर राज ठाकरेंचं प्रेम आहे." पुढे बोलताना गुरु माँ कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबतही वक्तव्य केलं.  त्या म्हणाल्या की, "राज ठाकरे यांनी डिसेंबरमध्ये अयोध्या दौऱ्यावर जाण्याचा विचार केला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून मुंबईत आलेल्यांनी निश्चिंत राहावं. कारण राज ठाकरे यांचं उत्तर भारतीयांवरील प्रेम त्यांच्यासोबत चर्चा करताना मला दिसलं." 




"मी राष्ट्रसाठी काम केलंय राजकारणाबाबत मला माहित नाही. हिंदुत्वाच्या मुद्यावर विचारधारा जर जमत असेल तर मनसेनं भाजपसोबत जायला हवं. नवं हिंदुत्व जन्माला येतंय आणि हे नवं हिंदुत्व ब्रिटीशांपेक्षाही भारी पडेल.", असंही गुरू माँ कांचनगिरी बोलताना म्हणाल्या. "राज ठाकरे यांचं अयोध्येत मोठं स्वागत केलं जाईल. सगळे त्यांच्यासोबत आहेत.", असा विश्वास गुरु माँ कांचनगिरी यांनी व्यक्त केलं. 


काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशदवाद्यांसोबत भारतीय जवानांची चकमक सुरु आहे. या चकमकीत आतापर्यंत 9 जवानांना वीरमरण आलं आहे. याबाबत विचारलं असता गुरु माँ कांचनगिरी म्हणाल्या की, "काश्मीमध्ये ज्या गोष्टी आधीपासून होत आहेत, काश्मीर जळतंय ते नेहरू आणि गांधी यांनी जी फाळणी केली त्यामुळं होतंय"