मुंबई :  मुंबई पुणे एक्सप्रेसवर बोरघाटात सहा वाहनं एकमेकांवर धडकून भीषण अपघात झाला. यामध्ये दोन टेम्पो, कार, खाजगी बस आणि ट्रेलरचा समावेश आहे. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू तर सहा प्रवासी जखमी झाले आहेत. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव येणाऱ्या कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पोने पुढे जाणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात टेम्पोने स्विफ्ट कारला धडक दिली, तर दुसऱ्या टेम्पोने कॉईल वाहून नेणाऱ्या ट्रकला धडक दिली. त्याच वेळी एका ट्रकने खाजगी बसला पाठीमागून धडक दिली. 


या विचित्र अपघातात स्विफ्ट कार ही दोन टेम्पोच्यामध्ये अडकल्याने कारचा चक्काचूर झाला आहे, तर कारमधील दोन प्रवासी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर टेम्पो चालकाचा देखील या अपघातात मृत्यू झाला आहे.


या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, देवदूत यंत्रणा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कार आणि टेम्पोमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातामध्ये एकूण सहा प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर पहाटे झालेल्या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली होती. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एकूण दोन टेम्पो, दोन कार, खाजगी बस आणि ट्रेलरचं मोठं नुकसान झालं आहे.


सुसाट वेगाच्या दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, दुचाकी ही पेटली, सीसीटीव्हीत भीषणता कैद


पुणे-मुंबई महामार्गावर सुसाट वेगाने निघालेल्या दुचाकीवरील दोघांचा अपघातात जागीच मृत्यू झालाय. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेने या अपघाताची भीषणता लक्षात येते. कारण अपघातानंतर दुचाकीने देखील पेट घेतला. तर गाडीवरुन पडल्यानंतर मृत तरुण आणि तरुणीमध्ये 40 ते 50 फुटांचे अंतर होते. पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी परिसरात हा अपघात रविवारच्या दुपारी झाला. दापोडी वरून हे तरुण आणि तरुणी निगडीच्या दिशेने निघाले होते. गाडीचा वेग सुसाट होता, अचानकपणे तरुणाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी स्लिप झाली. पुणे-मुंबई महामार्गातून सर्व्हिस रोडला येणाऱ्या डिव्हायडरला धडकली. तरुण एका बाजूला आणि तरुणी दुसऱ्या बाजूला फेकली गेली. तर गाडीने देखील जागीच पेट घेतला. सीसीटीव्हीतील या दृश्याने अपघाताची भीषणता लक्षात येते. तरुण-तरुणीच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. हीच दुचाकी पुढच्या एका दुचाकीला धडकल्याने त्यावरील दोघे किरकोळ जखमी झाले.