मुंबई : संपूर्ण भारतातून परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे कॅन्सरबाधित रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. मात्र, अनेकवेळा येथे येणारे रुग्ण हे गरीब घरातून असल्याने रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांसाठी राहण्याच्या जागेचा प्रश्न निर्माण होत असतो. अनेक वेळा हे नातेवाईक हॉस्पिटलच्या आजुबाजूच्या परिसरात मिळेल त्या ठिकाणी, फूटपाथावर , पुलाखाली राहत असतात. त्याच्याबद्दलची कैफियत अनेकवेळा माध्यमांमधून मांडण्यात आली आहे. मात्र त्यानंतर काही सामाजिक संस्था तात्पुरती व्यवस्था करतात, परंतु  पुन्हा आहे, ती परिस्थिती निर्माण व्हायची. अखेर यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याचे कायम म्हाडाने केले असून त्यांनी टाटा रुग्णालयाजवळ असणाऱ्या इमारतीत 100 फ्लॅट देण्याचा निर्णय आज जाहीर केला. या निर्णयामुळे रुग्णांचे आणि नातेवाईकाचे हाल व्हायचे ते थांबणार असून रुग्णांसाठी हा मोठा दिलासा आहे. 


टाटा रुग्णालयात वर्षभरात 70 हजार रुग्ण उपचार घेत असतात, त्यापैकी 60 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रा बाहेरून येत असतात. काही रुग्णांना आधी चाचण्या करायच्या असतात मग निदान झाल्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होते. मुळात एक तर टाटा रुग्णालयात भरती होण्याकरिता अनेकवेळा प्रतीक्षा करावी लागते. कारण खूप मोठा ताण या रुग्णालयावर आहे. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांवर खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्या तुलनेनं टाटा रुग्णलयात या आजारावर उत्तम उपचार आणि खर्चही कमी येतो, त्यामुळे बहुतांश रुग्ण या रुग्णालयात येत असतात. टाटा रुग्णालयाचे वैशिष्ट्य म्हणजे कॅन्सरच्या आजाराचे उपचार एकाच छताखाली होतात, त्यामुळे रुग्णाला फारसे कुठे बाहेर फिरावे लागत नाही. 


याप्रकरणी, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती देताना सांगितले कि, "म्हाडातर्फे टाटा रुग्णालयाजवळ असलेल्या इमारतीत 100 फ्लॅट रुग्ण आणि नातेवाईकांना राहण्यासाठी दिले आहे. यापुढे त्या खोल्याचे नियोजन कशा पद्धतीने असावे याचे सर्व अधिकार हे टाटा मेमोरियल हॉस्पिटल व्यवस्थापनाला असणार आहे. यामध्ये शासन कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. गेले अनेक वर्ष या रुग्णांची परवड होत होती. आज आम्ही हा निर्णय घेऊ शकलो याचे समाधान आहे. सगळ्यांनाच माहिती आहे कि येथे बाहेरगावावरून जे गरीब रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येथे उपचार घेण्यासाठी येत असतात, त्यावेळी त्यांचे रहाण्याच्या प्रश्नांवर खूप हाल होतात. त्यामुळे आजच्या या निर्णाणयामुळे काही प्रमाणात हा प्रश्न निकालात निघेल अशी आशा आहे.          


टाटा रुग्णालयात अनेक सामाजिक संस्था रुग्णांना उपचारात मदत व्हावी म्हणून कार्यरत असतात. त्या संस्थाचा रुग्णांना विविध माध्यमातून फायदा होत असतो. मात्र, रुग्ण टाटा रुग्णालयात परराज्यातून किंवा राज्यातील जिल्ह्यातून आल्यानंतर उपचार होईपर्यंत रुग्ण आणि नातेवाईकांनी राहायचे कुठे हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो. ज्यांना परवडते ते हॉटेल, लॉजमध्ये राहतात. तर काही जण आजूबाजूला असलेल्या धर्मशाळा, काही सामाजिक संस्थांनी अल्पदरात उभारलेल्या व्यवस्थेचा आधार घेत असतात, मात्र अनेक वेळेला या संस्थांमध्येही जागा नसते, मोठी प्रतीक्षा यादी येथे असते. त्यावेळी अनेक रुग्ण आणि नातेवाईक नाईलाजास्तव मिळेल त्या ठिकाणी फूटपाथ, पुलाखाली राहून दिवस काढत असतात. 


तर टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. एस एच जाफरी यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले कि, "खरंच खूप चांगला निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयायामुळे नक्कीच रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण बाहेरगावावरून येणारे रुग्ण आणि नातेवाईक यांची राहण्याची व्यवस्था एक मोठी गंभीर समस्या होती, त्यासाठी या खोल्याची नक्कीच मदत होईल. या खोल्याच्या बाबतीत नियजोन कसे असावे याबाबत हॉस्पिटल प्रशासन लवकरच निर्णय घेईल.