ठाणे : कोविड -19 रुग्णांकडून अवाजवी बिल आकारल्याने महाराष्ट्रातली पहिली कारवाई ठाण्यातील एका हॉस्पिटलवर करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांनी आदेश काढून या हॉस्पिटलचा कोविड रुग्णालयाचा दर्जा रद्द करून एक महिन्यासाठी मान्यता देखील रद्द केली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारे कोविड-19 चे रुग्ण पाहून सरकारने खाजगी रुग्णालयांना देखील कोविड-19 च्या रुग्णालयाचा दर्जा देऊन माफक दरात उपचार करण्याची परवानगी दिली होती. ठाण्यात ज्या पहिल्या चार रुग्णालयांना अशी मान्यता देण्यात आली त्यापैकी एक रुग्णालय होरायझन प्राईम होते. मात्र याच रुग्णालयाची मान्यता एका महिन्यासाठी रद्द करण्यात आली असून रुग्णालयाचा कोविड-19 चा दर्जा देखील काढून घेण्यात आला आहे.


ठाणे महानगरपालिकेने ही धडक कारवाई केली आहे. "या हॉस्पिटलने आतापर्यंत 797 रुग्णांवर उपचार केले असून, त्यापैकी 57 बिल्स मुख्य लेखा परीक्षकांच्या पथकाला त्यांनी सादर केली होती. त्यापैकी 56 बिल्स गैरवाजवी असल्याचे या पथकाचे म्हणणे होते. त्याबाबत खुलासा करण्याचे नोटीस हॉस्पिटलला देण्यात आली होती. मात्र त्या नोटीसीला उत्तर न दिल्याने आज कारवाई करण्यात आली. या 56 बिल्सची एकूण रक्कम 6 लाखांपेक्षा जास्त आहे", असं मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांनी सांगितले.


20 जुलैपर्यंत महापालिकेने दिलेल्या नोटीसला उत्तर देण्याची मुदत असताना आज पालिकेने कारवाई केल्यानंतर होरायझन प्राईम हॉस्पिटलच्या प्रशासनाला जाग आली. कारवाईचा आदेश मिळाल्यानंतर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर महापालिका आयुक्त यांना भेटायला पालिकेत आले होते. त्यांनी पालिकेच्या कारवाई विरोधात अपील केले असून ही कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे. "आम्ही अतिशय काळजीपूर्वक सर्व ररुग्णांवर उपचार केले आहेत. 100 पेक्षा जास्त रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले योजनेनुसार उपचार केले आहेत, तर पालिकेने दिलेल्या नोटीसीला उत्तर देखील दिलेले आहे. त्यामुळे ही कारवाई मागे घेऊन पुन्हा परवानगी देण्यात यावी," असे या हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर हृषीकेश वैद्य यांनी सांगितले.


कोविड-19 च्या हॉस्पिटलचा दर्जा असलेल्या हॉस्पिटल्सना सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसार रुग्णांना बिल करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील अनेक रुग्णालयांनी अवाजवी बिल आकारण्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून ठाण्याच्या आयुक्तांनी मुख्य लेखा परीक्षकांच्या अधिपत्याखाली एका पथकाची स्थापना करून सर्व रुग्णालयांची चौकशी सुरू केली.


मुख्य लेखा परीक्षक यांच्या अधिपत्याखाली पथकाने केलेल्या तपासणीत 15 वेगवेगळ्या कोविड-19 च्या हॉस्पिटलमधील 1752 देयकांची तपासणी करण्यात आल्या. त्यापैकी 486 देयकांची या पथकाने तपासणी करून एकूण 196 आक्षेपित देयकांची नोंद या पथकाने केली. त्या एकूण 196 आक्षेपित देयकांची रक्कम ही 27 लाखांपेक्षा जास्त होती. त्यामुळे या रुग्णालयांना आता नोटीस बजावण्यात आली होती.


या नोटिशीला उत्तर देण्यासाठी काही दिवसांची मुदत देऊनही होरायझन प्राईम हॉस्पिटल प्रशासनाने काहीही उत्तर न दिल्याने आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सध्या या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांचे पथक 24 तास हॉस्पिटलमध्ये असणार आहे. अशीच कारवाई येणाऱ्या काळात देखील अनेक हॉस्पिटलवर करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या कारवाईमुळे नक्कीच हजारो रुग्णांना दिलासा मिळाला असून त्यांचे जास्तीचे पैसे देखील परत देण्यात येणार आहेत.