मुंबई : बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने जखमी झालेल्या गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असून त्याची प्रकृती सध्या चांगली असल्याची माहिती आहे. गोविंदाच्या प्रकृतीचे अपडेट्स घेण्यासाठी त्याचे अनेक चाहते डॉक्टरांच्या प्रतिक्रियेकडे वाट लाऊन बसलेले असताना गोविंदाला मात्र वेगळीच चिंता सतावत असल्याचं समोर आलं आहे. पायावरील शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपण यापुढे डान्स करू शकणार का असा पहिला प्रश्न गोविंदाने त्याच्या डॉक्टरांना विचारला आहे. तशी माहिती गोविंदाचे मॅनेंजर शशी सिन्हा यांनी माध्यमांना दिली. 


डॉक्टर, मला पुढच्या आयुष्यात नाचता येईल का? असा पहिला प्रश्न गोविंदाने डॉक्टरांना विचारला. या काळात गोविंदासोबत जे सावलीसारखे उभे होते त्या शशी सिन्हा यांनी ही माहिती दिली. 


शशी सिन्हा काय म्हणाले?


सकाळी मी विमानतळावर होतो आणि गोविंदाने मला फोन केला की तुम्ही पुढे जा आणि तिकडे थांबा, मी 5 वाजेपर्यंत येतो. त्यानंतर सकाळी 4.45 वाजता त्याला कॉल केला. पण त्याने तो उचलला नाही. मग मी पुन्हा प्रयत्न केला तर तो जड आवाजात म्हणाला, भाऊ, मला खूप त्रास झाला आहे. माझ्या हातातून रिव्हॉल्वर निसटली आणि पायात अडकली. तुम्ही थेट हॉस्पिटलमध्ये या.


त्यानंतर मी आणि नर्मदा (टीना) तासाभर आयसीयूच्या बाहेर बसलो. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, तुम्ही निश्चिंत राहा, तो आता पूर्णपणे बरा आहे. त्यावेळी डॉक्टरांनी मला सांगितले की गोविंदाने त्यांना पहिला प्रश्न विचारला की तो यापुढे कधी डान्स करू शकेल का? त्यावेळी माझ्या डोळ्यातून अश्रू आले. 


गोविंदाच्या पायाला गोळी लागली, नेमकं काय घडलं? 


बॉलिवूड स्टार गोविंदा याच्या पायाला मंगळवारी, त्याच्याकडील लायसन्स बंदुकीतून गोळी लागली होती. त्याच्यावर क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार केल्यानंतर, त्याला आज जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. या गोळी प्रकरणी पोलिसांनी गोविंदाचा जबाब नोंदवला असला तरी त्याच्या उत्तरांनी पोलिसांचं समाधान झालेलं नाही. 


बंदुकीचा ट्रिगर गोविंदानेच दाबल्याचा संशय पोलिसांना आहे. तसंच अनेक प्रश्नांची उत्तरही अद्याप पोलिसांना सापडलेली नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे गोविंदाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिस पुन्हा त्याचा जबाब नोंदवू शकतात. 


गोविंदा मंगळवारी सकाळी पावणे सहा वाजता कोलकत्याला जाणार होता. कोलकत्याला जाण्यासाठी बॅग भरताना गोविंदानं बंदूक बाहेर काढली. त्या बंदुकीमध्ये सहा गोळ्या होत्या. त्यापैकी एक गोळी मिसफायर झाल्याची माहिती आहे. 


ही बातमी वाचा :