मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते गोविंदा हे मंगळवारी गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना गोळी कशी लागली, याबाबत वेगवेगळी माहिती समोर  आली होती. एका थिअरीनुसार गोविंद (Govinda) हे पहाटे पाच वाजता रिव्हॉल्व्हर साफ करत होते, तेव्हा चुकून ट्रिगर दाबला जाऊन त्यांना गोळी लागली, असे सांगितले जाते. तर दुसऱ्या थिअरीनुसार गोविंदा हे बाहेर जाण्यासाठी निघाले होते तेव्हा रिव्हॉल्व्हर कपाटातून खाली पडून त्यांना गोळी लागली, अशी माहितीही समोर आली होती. त्यानंतर आता पोलीस चौकशीतही गोविंदाने दिलेली माहिती संशयास्पद असल्याचे आढळले आहे.


गोविंदा यांच्यावर जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोळी लागल्यानंतर  त्यांच्या पायातून मोठ्याप्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन गोविंदा यांच्या गुडघ्यात शिरलेली गोळी बाहेर काढली होती. त्यानंतर गोविंदाची प्रकृती स्थिर होती. यादरम्यान पोलिसांनी गोविंदाचा जबाब नोंदवला होता. या जबाबात अनेक विसंगती आढळून आल्याची माहिती आहे.


मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 9 चे प्रभारी दया नायक यांनी मंगळवारी क्रिटी केअर रुग्णालयात जाऊन गोविंदा यांची भेट घेतली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस गोविंदा यांनी दिलेल्या जबाबावर संतुष्ट नाहीत. चौकशीवेळी गोविंदा यांना अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. गोविंदाचा एकुण जबाब पाहता रिव्हॉल्व्हरमधून गोळी अचानक सुटली नसून गोविंदा यांनी स्वत:च ट्रिगर दाबल्याचा संशय पोलिसांना आहे. याशिवाय, पोलिसांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. त्यामुळे गोविंदा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलीस पुन्हा एकदा त्यांचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती आहे. गोविंदा यांच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने पोलीस आता रिव्हॉल्व्हरच्या बॅलेस्टिक अहवालाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. 


पोलिसांना कोणत्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत?


गोविंदा यांना चुकून गोळी लागल्याचे वृत्त समोर आल्यापासूनच अनेकजण संपूर्ण घटनाक्रमाविषयी संशय व्यक्त करताना दिसत आहेत. पोलिसांनाही गोविंदा यांच्याकडून अपेक्षित असलेल्या काही प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. गोविंदा यांनी आपल्या जबाबात रिव्हॉल्व्हर कपाटातून खाली पडली आणि गोळी सुटली, असे सांगितले. पण रिव्हॉल्व्हर खाली पडल्यानंतर अचानक गोळी कशी सुटेल? गोविंदा रिव्हॉल्व्हर घरी ठेवून जाणार होते, तर मग गन लोड का केली होती? घरी ठेवलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या का काढून ठेवण्यात आल्या नव्हत्या,  असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले आहेत. आता पुढील चौकशीत गोविंदा यांच्याकडून या प्रश्नांची उत्तरं मिळणार का, हे आता पाहावे लागेल.



आणखी वाचा


गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला