Governer Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)आपल्या वक्तव्यांमुळं नेहमी चर्चेत असतात. आता त्यांनी कोरोना लसीकरणाला (Corona Vaccination) विरोध करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. राज्यपाल  कोश्यारी यांनी कुणाचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे लसीकरण मोहिमेचा विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधानांनी लसीकरण कार्यक्रम जाहीर केला तेव्हा काहींनी विरोध केला. मात्र अशाच लोकांनी आता बूस्टर डोस देखील घेतला असल्याचे राज्यपालांनी म्हटलं आहे. 


ज्या विद्यार्थ्यांनी कोविडमध्ये आपले पालक गमावूनही दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये सर्वोच्च कामगिरी केली आहे. अशा विद्यार्थ्यांचा सत्कार अंधेरी पश्चिमेकडील यारी रोड येथील चिल्ड्रेन वेल्फेअर स्कूलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्य अजय कौल यांच्या एकता मंच या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


हे विद्यार्थीही एकप्रकारे कोरोना योद्धेच आहेत...


यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, कोरोना काळात अनेकांनी आपल्या नातेवाईक आणि पालकांना गमावले आहे. अशावेळी त्यांच्यापुढे बोलणे अवघड असते. याही परिस्थितीत या विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगली कामगिरी केली आहे. ते सुद्धा एकप्रकारे कोरोना योद्धे आहेत. आज या कोरोना योद्धांचा सन्मान एकता मंचच्या माध्यमातून केला जात आहे. कोरोना काळात एकता मंचने देखील अनेकांच्या घरात रेशन आणि औषध पोहोचवण्याचं काम केले. देशातील मानवतेचं हे उदाहरण आहे. जग  केवळ धन दौलत, बंगला गाडीवर चालतं नसून आपल्यातील दया, सहकार्य आणि सेवा यावर चालत आहे आणि हीच आमची शक्ती आहे, असं राज्यपाल कोश्यारींनी म्हटलं आहे. 


राज्यपाल म्हणाले की, आपल्यात दया असेल आणि आपण दुसऱ्यांसाठी ज्ञान आणि प्रेम देऊ शकतो. त्यावेळी आपण सुद्धा भगवानच बनतो. मागील दोन वर्षाच्या काळात विविध कोरोना योद्ध्यांचा सन्मान राजभवनात करण्यात आला. कोरोना काळात 500 पेक्षा अधिक कार्यक्रम राजभवनमध्ये केले.  कार्यक्रम संपल्यावर इथून जाताना अनेक ठिकाणी वाहतुकीचे रस्ते सामान्यांसाठी बंद केले जातील. माझ्यामुळे कदाचित आता रस्ता बंद होऊल गणेश भक्त शिव्या देतील. पण तरीसुद्धा मी या कार्यक्रमाला आलो, असंही राज्यपाल म्हणाले. 


यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, आपण एरवी एकमेकांशी लढतो, झगडतो पण कोरोना काळात कोण कुठल्या पार्टीचा, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा  हे सर्व विसरून आपले काम प्रामाणिकपणे केले. हीच भारताची महानता आहे. विदेशी लोक सुद्धा या एकतेवर आश्चर्य व्यक्त करतात. कोरोना काळात डॉक्टर, नर्स आणि इतरांनी खूप महान काम केलं ते देवापेक्षाही कमी नाहीत, असेही कोश्यारी यावेळी बोलताना म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या


ठाकरेंना शिंदेंचा पुन्हा धक्का! राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी शिंदे सरकारनं मागे घेतली


राज्यपालनियुक्त लवकरच 12 नवे चेहरे? शिंदे सरकार राज्यपालांना नवी यादी देणार