मुंबई : राज्यात येत्या काही दिवसात रेस्टॉरंट आणि मंदिरं मर्यादित क्षमतेने सुरु करण्याचा विचार आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. येत्या 3 ते 4 दिवसात यासंदर्भात ठोस निर्णयाची शक्यता आहे.


मार्चपासून बंद असलेली राज्यातील मंदिरं सुरु करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. याबाबत विविध पक्षांकडून आंदोलनंही केली जात आहेत. त्याचाच विचार करुन मंदिरं मर्यादित क्षमतेने सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. राज्यातील मंदिरांसाठी ई-दर्शनाच्या माध्यमातून मर्यादित संख्येने देवदर्शन करता येऊ शकेल, अशी पद्धत अवलंबण्यासंदर्भात चर्चा झाली. तसंच ई-दर्शन किंवा मंदिरात जाण्याची वेळ बुक करता येऊ शकेल, अशा पद्धतीबद्दलही टास्क फोस्ट बैठकीत चर्चा करण्यात आली.


गृहविभागाची तयारी सुरु
कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेच्या आधारावर राज्य शासनाच्या गृह विभागाने तयार सुरु केली आहे. राज्यातील महत्त्वाच्या देवस्थानांकडून मंदिरं खुली करण्यासंदर्भात आराखडा मागवण्याचा विचार सुरु आहे. शिर्डी साई संस्थान, सिद्धिविनायक मंदिर न्यास, पंढरपूर विठ्ठल मंदिर संस्थान अशा प्रत्येक देवस्थानांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार SOPs (नियमावली) बनवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. भाविकांच्या गर्दीचे नियोजन, स्वच्छतागृह, प्रसादालाय, पूजा-अर्चा-अभिषेक अशा विधींबाबत घ्यायची काळजी या बाबींचा आराखड्यात समावेश असेल


याशिवाय सध्या रेस्टॉरंटमध्ये पार्सलचीच सोय उपलब्ध आहे. त्यामुळे आता पार्सलव्यक्तिरिक्त दहा टक्के क्षमतेची सीटिंग रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत विचार सुरु असल्याचं कळतं.


लोकल सुरु होण्यासाठी वाट पाहावी लागणार
मंदिर आणि रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत चर्चा सुरु असली तरी मुंबईतील लोकल सेवा सुरु होण्यास अजून वाट बघावी लागणार आहे. जोपर्यंत मुंबईचा आजूबाजूचा परिसर, एमएमआर भागातील कोरोनाचा प्रादूर्भाव आटोक्यात येत नाही, तोपर्यंत मुंबईतील लोकल सुरु होण्याची शक्यता कमीच आहे.


शाळांबाबत अद्याप निर्णय नाही
शाळा सुरु करण्यासंदर्भातही कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे लोकलप्रमाणेच शाळा सुरु होण्यासही काही काळ वाट बघावी लागणार आहे.