मुंबई : कोरोनाबाधितांची संख्या राज्यात आणि मुंबईत वाढत असताना दिलासा देणारी बातमी म्हणजे गेल्या 44 तास 33 मिनिटात म्हणजेच दोन दिवसात चार मेंदूमृत व्यक्तींचे अवयवदान करण्यात आले आहे. यामुळे सात व्यक्तींना जीवदान मिळाले आहे. गेल्या वर्षात कोरोनाचा काळ असल्यामुळे मेंदूमृत अवयवदान फार कमी प्रमाणात झाले होते. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर अवयवांची गरज असणारी रुग्णांची प्रतीक्षायादी खूप मोठी आहे. 3 ते 4 मार्च या दोन दिवसात हे अवयवदान पार पडले.


गेल्या दोन दिवसात मुंबई शहरातील एस एल रहेजा फोर्टिस हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल, फोर्टिस हॉस्पिटल आणि नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटल या चार रुग्णालयात अवयवदान करण्यात आले. या अवयवदानातून चार किडन्या आणि तीन लिव्हर मिळाले असून या सर्व अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. त्यामुळे जे कुणी सात व्यक्ती या अवयवांसाठी प्रतीक्षा यादीवर होते त्यांना हे अवयव देण्यात आले. ज्यावेळी अवयव मेंदूमृत व्यक्तीचे अवयव काढले जातात त्यावेळी प्रत्यारोपणासाठी जे अवयव योग्य असतात तेच काढले जातात.


या चार कुटुंबीयांनी जो अवयवदानाचा निर्णय घेतला आहे तो फार महत्त्वपूर्ण आहे. आपली व्यक्ती जाण्याच्या दुःखात त्यांनी हा चांगला निर्णय घेऊन जे व्यक्ती या अवयवांच्या प्रतीक्षेत होते त्यांना यामुळे जीवदान मिळाले असल्याचे डॉ एस के माथुर यांनी सांगितले. डॉ माथुर हे मुंबई झेड टी सी सी या संस्थेचे अध्यक्ष आहेत. झेड टी सी सी ही संस्था ही प्रतीक्षा यादीवरील रुग्णांसाठी अवयव नियमनाचे काम करते. त्याचप्रमाणे या दोन दिवसातील चार अवयवदानासाठी विविध रुग्णालय आणि प्रतीक्षा यादीवरील रुग्णांशी संपर्क साधणे हे कठीण काम झेड टी सी सी या संस्थेच्या समन्वयक उर्मिला महाजन यांनी हे काम व्यवस्थितपणे पार पाडले.


राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेच्या माहितीनुसार, सध्या राज्यात साधारणतः अवयवांची गरज असणारी रुग्णाची प्रतीक्षा यादी खूप मोठी आहे. मूत्रपिंडासाठी 5487, यकृतासाठी 1095, हृदयासाठी 87 आणि फुफ्फुसासाठी 19 रुग्ण प्रतीक्षेत आहेत. यापैकी किडनीसाठी प्रतीक्षेत असणारे रुग्ण डायलिसिसवर आणखी काही महिने जगू शकतात. मात्र हृदय, यकृत आणि फुफ्फुस यासारखे अवयव असणाऱ्या रुग्णाची परिस्थिती ही बिकट असते. कारण त्यांना अवयव प्रत्यारोपण करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.


झेड टी सी सी या संस्थेच्या आयसीयू समितीचे प्रमुख डॉ राहुल पंडित यांनी सांगितले की, "या अवयवदान प्रक्रियेत सर्व हॉस्पिटलच्या लोकांनी या नातेवाईकांना दुःखाच्या प्रसंगांत मोठा आधार दिला. त्यामुळे या सर्व हॉस्पिटलमध्ये या प्रक्रियेत काम करणाऱ्या सर्वांनी चांगली जबाबदारी निभावली आहे असे मला वाटते."

आपल्या देशात आणि राज्यात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, 1994 अंतर्गत अवयव प्रत्यारोपण केले जाते. कालांतराने या कायद्यात अधिक बदल करुन 2014 साली काही सुधारणा करण्यात आल्या. आपल्याकडे मेंदूमृत अवयवदानामध्ये हृदय, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, त्वचा, डोळे, फुफ्फुसे आणि आतडे देखील दान केले जाते. या यामध्ये त्वचेचा वापर गंभीररित्या भाजलेल्या व्यक्तीमध्ये करता येतो. अन्य अवयवाचे त्या रुग्णाच्या गरजेनुसार त्या रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करता येते. ज्या रुग्णांचा एखादा अवयव कायमचा निकामी होतो आणि औषध उपचारानेही बरा होत नाही त्यावेळी त्याला अवयव प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यावेळी त्या रुग्णाच्याच नात्यातील निरोगी व्यक्तीचा अवयव घेऊन रुग्णाच्या शरीरात त्या अवयवाचे प्रत्यारोपण केले जाते. त्याकरिता रक्तगट मॅचिंग होणे गरजेचे असते. जिवंत व्यक्ती जवळच्या नातेवाईकाला अशा पद्धतीने अवयव देऊ शकतात. फक्त मूत्रपिंड आणि यकृत याच अवयवाचे जिवंतपणी दान करता येते. या व्यतिरिक्त जे अवयव दान करता येते त्याला मेंदूमृत अवयवदान असे म्हणतात.