मुंबई : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला महाराष्ट्रातील पहिले हरित रेल्वे स्थानक झाल्याने इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलकडून सुवर्ण प्रमाणपत्र देण्यात आले आहे. असे प्रमाणपत्र मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्थानक आहे. मंगळवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी आपल्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या पथकासह आयजीबीसीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गुरमितसिंग अरोरा यांच्याकडून आयजीबीसीचे प्रमाणपत्र स्वीकारले.


मध्य रेल्वेने आपल्या सीएसएमटी स्थानकात विविध हरित उपक्रम राबविले आहेत. ज्यात वृक्षारोपणाद्वारे हरित क्षेत्रे तयार करणे, सौर पॅनेल बसविणे, अनेक स्थानकांवर ग्राहक अनुकूल उपक्रम राबविणे, एलईडी बल्ब आणि दिवे लावणे अश्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. इतकेच नाही तर संपूर्ण स्थानकामध्ये नवीन प्रकारचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. या सूचना फलकांमुळे सीएसएमटी स्थानकाचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. नागरिकांना त्यांच्यासाठी असलेल्या सुविधा शोधत फिरावे लागत नाहीत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सूचना फलक आता लावण्यात आल्याने प्रवाशांना त्याचा फायदा होत आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.



सुवर्ण प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केलेले बदल :




  • स्थानक दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुकूल बनविण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

  • इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रोत्साहित करण्यासाठी काही पार्किंगच्या जागांवर इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट्स सुरू करण्यात आले आहेत.

  • स्थानकाच्या एकूण क्षेत्राच्या 15% पेक्षा जास्त भागात झाडे आणि लहान उद्याने बनवली आहेत.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक इथे 245 किलोवॅट क्षमतेचे सौर पॅनेल स्थापित केले आहेत.

  • स्थानकात 100% एलईडी दिवे बसवण्यात आलेले आहेत.

  • विविध कार्यालये आणि प्रतीक्षालयांमध्ये 17 ओक्युपेंसी सेन्सर स्थापित केले आहेत.

  • ऊर्जा कार्यक्षम बीएलडीसी आणि एचव्हीएलएस पंखे विविध ठिकाणी लावले आहेत.

  • यांत्रिकी सफाई कॉन्ट्रॅक्ट ज्यात प्लॅटफॉर्म, सभोवतालचे क्षेत्र, पार्किंगची ठिकाणे, ट्रॅक, छत, शटर, वेटिंग हॉल इत्यादींवर लक्ष केंद्रित केले जाते. कंत्राटदारांनी वापरलेली रसायने बायो-डिग्रेडेबल आणि इको-फ्रेंडली आहेत.

  • वायफाय, स्वयंचलित तिकिट विक्री यंत्रे, पर्यटन माहिती व बुकिंग सेंटर, फूड कोर्ट, औषधे आणि वैद्यकीय सुविधा सारख्या स्मार्ट प्रवासी सुविधा बसवण्यात आल्या आहेत.