Gokhale-Barfiwala Flyover Issue : मुंबईकरांचा वेळ वाचवणारा, वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणारा ब्रीज अर्थात अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले ब्रीज. या एका पुलामुळे वाहनचालकांचा बराच वेळ वाचतो. पण ब्रिटीशकालीन हा पूल जीर्ण झाला आणि वाहतुकीसाठी बंद कऱण्यात आला. पुलाच्या पुनर्विकासानंतर एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाली. 200 कोटी खर्चून बीएमसीने नव्याने पूल बांधला खरा पण त्यातही घोळ झाला. बांधकामात चूक झाल्याने 100 कोटींचा अधिक फटका बसणार आहे.
त्रास, मनस्ताप! सर्वसामान्यांचा पैसा खर्च होणार
अंधेरीतील बहूप्रतीक्षित गोखले पुलाची एक मार्गीका नुकतीच काही दिवसांपूर्वी सुरू झाली. दोन वर्षांपूर्वी हा पूल तोडून त्या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू होते. त्यामुळे गेले दोन वर्ष हा पूल बंद असल्याने या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांना त्रास, मनस्ताप आणि मोठ्या प्रमाणात पैसे खर्च झाले. अखेर करोडो रुपये खर्चून दोन वर्षानंतर हा पूल झाला खरा. मात्र पुन्हा एकदा सर्वसामान्यांना या पुलाच्या चुकीच्या बांधकामामुळे त्रास, मनस्ताप आणि सर्वसामान्यांचा पैसा खर्च होणार आहे. त्यामुळे या सर्वाला जबाबदार कोण? यावरच एक विशेष रिपोर्ट
गोखले पूल हा चर्चेचा विषय
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोपाळकृष्ण गोखले पूल 2018 पासून यांना त्या कारणास्तव चर्चेत आहे . या पुलाचा भाग जुलै 2018 मध्ये कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे 7 नोव्हेंबर 2022 पासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, सर्वसामान्य प्रवाशांचे पायी जाण्यासाठी हाल आणि सर्वसामान्यांचा खर्च झालेला पैसा यामुळे गोखले पूल चर्चेत आहे.
पुलाचं बांधकाम आणि चुकलेला प्लॅन
सुरुवातीपासून पूल बंद करण्यापासून ते तोडण्यापर्यंत, गर्डर टाकण्यापासून ते उद्घाटन करण्यापर्यंत गोखले पूल हा चर्चेचा विषय ठरत आहे. गोखले उड्डाणपुलाचे कोटी रुपये खर्च करुन पाडकाम पश्चिम रेल्वे, तर पुलाची पुनर्बांधणी मुंबई महापालिकेने केली. या पुलाचे काम दिनांक 1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आले. करोडो रुपये या पुलासाठी आतापर्यंत खर्च झाले आणि अखेर या पुलाची एक मार्गीका 26 फेब्रुवारीला सुरू करण्यात आली आहे. मात्र या पुलाची एक मार्गीका सुरू झाल्यानंतरही आजही हा पूल चर्चेत आहे. याला कारण म्हणजे या पुलाचं झालेलं बांधकाम आणि चुकलेला प्लॅन यामुळे प्रशासनाच हसं झालय.
गोखले पूल आणि बर्फीवाला पूल जोडणे शक्य नाही
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पूल आणि सी डी बर्फीवाला पूल एकमेकांना जोडणे शक्य नाही. असा कठीण उतार दिल्यास अपघात होण्याची शक्यता असल्याचा महापालिका प्रशासनाला अखेर उलगडा झाला आहे. त्याचाच भाग म्हणून व्हीजेटीआयची मदत घेऊन यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, खरा प्रश्न असा यापूर्वी या पुलाचे बांधकाम करताना पालिका प्रशासनाला हे लक्षात आलं नाही का? असे अनेक सवाल सध्या सर्वसामान्य आणि ए बी पी माझा उपस्थित करत आहे.
गोखले पुलाची निर्मितीचा प्लॅन का फसला?
- गोखले पुलाची निर्मितीचा प्लॅन फसण्याला महापालिका अधिकारी, तज्ञ, रेल्वे अधिकारी, लोकंप्रतिनिधी आणि कंत्राटदार जबाबदार आहेत का?
- करोडो रुपये खर्च करून का जोडला नाही, गोखले आणि बर्फीवाला ब्रिज?
- प्रशासनाने निर्मिती करताना घाई आणि हयगय केली का?
- सर्वसामान्यांचा पैसा खर्च , वाहतूकदारांना आणि स्थानिकांना झालेला आतापर्यंतचा त्रासाला जबाबदार कोण?
असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
भोंगळ कारभार करणारे नक्की जबाबदार कोण ?
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी एका माध्यम संस्थेला माहिती देताना बर्फी वाला पूल तोडून त्याची जोडणी गोखले पुलाला करण्यासाठी 50 कोटी रुपये खर्च करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे गोखले पुलाच बांधकामं आणि भोंगळ कारभार करणारे नक्की जबाबदार कोण ? असाही सवाल उपस्थित होऊ लागलाय. आतापर्यंत गोखले पूल बांधकामात कोण कोण अधिकारी आणि लोकप्रतिनिधी काम करत होते आणि कोणाच्या अखत्यारीत येतात
गोखले पुलाच्या भोंगळ कारभाराला हे जबाबदार ?
- मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल
- महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू
- बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले (निवृत्त)
- प्रमुख अभियंता (पूल) विवेक कल्याणकर
- तसेच पश्चिम रेल्वेचे अधिकारी मे. राईट्स लि.
- कंत्राटदार ए. बी. इन्फ्राबिल्ट यांचे प्रतिनिधी
- आमदार अमित साटम आणि ऋतुजा लटके
हे सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या ब्रिज संदर्भात काम करत होते त्यामुळे या भोंगळ कारभाराला हे जबाबदार आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.
ब्रिज जोडण्यासाठी व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांची मदत
दोन्ही ब्रिज जोडण्यासाठी व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. व्हीजेटीआयच्या तज्ञांनी या संदर्भात पुलाचे पाहणी केली असून लवकरच अहवाल देतील. मग महापालिका त्यावर काम करणार आहे. सध्या गोखले पूलाची सध्या एकच बाजू सुरू झाली असून पुलाची दुसरी बाजू सुरू करण्यासाठी 31 डिसेंबर 2024 ची मुदत देण्यात आली आहे. तेव्हाच हे दोन्ही पूल जोडण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लोकांना होणारा मनस्ताप , त्रास आणि खर्च होणारा पैसा यामुळे याला जबाबदार कोण असा सवाल सर्वसामान्य उपस्थित करत आहेत.
सर्वसामान्यांचे हाल
गोखले पूल तयार होण्यापूर्वी अनेक बैठका महापालिका अधिकारी रेल्वे अधिकारी लोकप्रतिनिधींनी घेतल्या, त्यामुळे त्यांच्या हे यापूर्वीच लक्षात का आलं नाही, असाही सवाल यातून उपस्थित होतो. सर्वसामान्यांचा पैसा वेळ आणि त्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता या पुलाच्या चुकीच्याबांधकामा संदर्भात मागणीनुसार कोणती चौकशी समिती स्थापन होते का आणि दोषींवर कारवाई होते का हे आता पुढील काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.