मुंबई : पुरवठादारांकडून अटी शर्तीची पूर्तता न झाल्याने ग्लोबल व्हॅक्सिन टेंडर रद्द करण्यात आलं असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. पुरवठा करणाऱ्यांवर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न होता कारण यात एकही निर्माता नव्हते. केंद्र सरकार व्हॅक्सिन देतं आहे, त्यांनी खासगीऐवजी पालिका आणि राज्याला मुबलक प्रमाणात पुरवठा करावा, असं त्या म्हणाल्या. त्यांनी म्हटलं की, महापालिकेच्या माध्यमातून अनेक दिग्गजांनी लस घेतल्या आहेत. सर्वांना मोफत लस देत आहोत आणि देणार, यासाठीच सर्व प्रयत्न आहेत, असं त्या म्हणाल्या. 


सर्व मुंबईकर नागरिकांना कोविड - 19 प्रतिबंधक लस देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जागतिक स्तरावर प्रसिद्धीस दिलेल्या लस पुरवठा स्वारस्य अभिव्यक्तीमध्ये प्रतिसाद दिलेले सर्व 9 संभाव्य पुरवठादार कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी अपात्र ठरले आहेत. असे असले तरी, महानगरपालिका प्रशासनाने कोविड लसीकरणाचे महत्त्व लक्षात घेता, स्पुटनिक या रशियन लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी आज संपर्क साधला असता त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात स्पुटनिक लसींचा साठा महानगरपालिकेला देण्याची तयारी दर्शविली आहे. 


दोनवेळा मुदतवाढ


बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड लस पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने जागतिक स्तरावर दिनांक 12 मे 2021 रोजी स्वारस्य अभिव्यक्ती (Expression of Interest) प्रकाशित केली. त्यास प्रतिसाद देणाऱ्या संभाव्य पुरवठादारांना (Supplier) आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने पहिल्यांदा दिनांक 25 मे 2021 पर्यंत आणि दुसऱ्यांदा दिनांक 1 जून 2021 पर्यंत अशी दोनवेळा मुदतवाढ दिली. तसेच कागदपत्रं पूर्तता करण्याचे निर्देश देऊन दूरदृश्य प्रणालीद्वारे सातत्याने चर्चादेखील केली. 


Mumbai Corona Cases : मुंबईत गेल्या 24 तासात 973 कोरोनाबाधित तर 1207 रुग्णांना डिस्चार्ज, धारावीत सलग दुसऱ्या दिवशी एक रुग्ण


विशेषतः लस पुरवठा करण्यास इच्छुक असलेले पुरवठादार आणि प्रत्यक्ष लस उत्पादीत करीत असलेल्या कंपन्या या दोहोंदरम्यान असलेले व्यावसायिक संबंध पडताळून पाहणे अत्यावश्यक होते. जेणेकरुन दिलेल्या मुदतीत आणि सुरळीपणे लस पुरवठा होईल, याची खात्री पटेल. त्यासोबत नेमक्या किती दिवसात लस पुरवठा होईल, किती संख्येने लस साठा पुरवला जाईल, लसीचे दर व रक्कम अधिदान करण्याच्या अटी व शर्ती या 4 मुख्य पैलूंचा अतिशय बारकाईने अभ्यास करुन महानगरपालिका प्रशासन कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करण्याविषयी सातत्याने पाठपुरावा करीत होते. 


अंतिम मुदतीनंतर एकूण प्राप्त 9 संभाव्य पुरवठादारांनी सादर केलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांची महानगरपालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर कार्यवाही करुन छाननी केली. छाननीअंती यातील एकही पुरवठादार संपूर्ण कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी पात्र ठरु शकलेला नाही.


लस साठा उपलब्ध करुन घेण्याचे प्रयत्न सुरु


असे असले तरी, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करुन घेण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  पी. वेलरासू यांनी स्पुटनिक या रशियन लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी आज चर्चा केली. त्यानुसार, प्रायोगिक तत्वावर स्पुटनिक लसीचा काही प्रमाणात साठा बृहन्मुंबई महानगरपालिकेला जून 2021 अखेरपर्यंत देण्याची तयारी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी दर्शविली आहे. स्पुटनिक लसीच्या शीतगृहातील साठवणुकीचे निकष वेगळे आहेत. त्यामुळे हा साठा मिळाल्यानंतर त्याच्या शीतगृहातील साठवणुकीची चाचपणी करण्यात येईल. तसेच जुलै व ऑगस्ट 2021 या दोन महिन्यांमध्ये स्पुटनिक लसीचा साठा मोठ्या प्रमाणात देण्याबाबत देखील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याकडे विचारणा करण्यात आली आहे. याअनुषंगाने येत्या आठ ते दहा दिवसांत पुन्हा डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्यासमवेत चर्चा केली जाणार आहे.