मुंबई: घाटकोपरमधील साईदर्शन इमारत कशी कोसळली याचं वास्तव आता हळूहळू समोर येतं आहे. इमारतीचे पिलरच काढून टाकल्यानं ही इमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा बळी गेला असून अजूनही बचाव कार्य सुरु आहे.

आरोपी सुनिल शितपनं नर्सिंग होमच्या नूतनीकरणावेळी चक्क इमारतीचे पिलर बाजूला काढून त्याठिकाणी लोखंडी रॉड लावले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इमारतीचे पिलर काढून त्या जागी लोखंडी रॉड लावण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

रुग्णालयाचं नूतीनकरण करताना इमारतीच्या मूळ रचनेलाच धक्का लावण्यात आला होता. यावेळी पिलर तोडून लोखंडी रॉडनं आधार देण्यात आला होता. तसेच इमारतीच्या कॉलमलाही धक्का लावण्यात आल्यानं इमारत कोसळली असा दावा रहिवाशांनी केला आहे.

आज (बुधवार) सकाळी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बरेच लोखंडी रॉड काढण्यात आले. दरम्यान, याबाबत आता सखोल चौकशी होणार आहे. यामध्ये ज्या कंत्राटदाराचा सहभाग होता त्याच्यावरही कारवाई होणार असल्याचं समजतं आहे.

काय आहे नेमकी घटना?

साईदर्शन ही इमारत 30 वर्षे जुनी होती. इथे राहणाऱ्या 17 जणांवर काल (मंगळवार) काळाने घाला घातला.

इमारत अनधिकृत नव्हती : प्रकाश मेहता

साईदर्शन इमारत अनधिकृत नव्हती. चौकशी करुन दोषींवर कारवाई करु, असं आश्वासन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिलं आहे. तसंच या विभागात अनेक इमारतींना ओसी नाही. महापालिकेने त्वरित स्ट्रक्चरल ऑडिट करावं, अशी सूचनाही त्यांनी केली.

इमारतीला नोटीस नाही : महापौर

या इमारतीला कुठलीही नोटीस दिली  नसल्याचं मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी माहिती दिली. शिवाय दोषींवर योग्य कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

संबंधित बातम्या:

मुंबईतील घाटकोपरमध्ये इमारत कोसळली

इमारत दुर्घटना : पत्नी आयसीयूत, चिमुरडी गमावली, आईचा पत्ता नाही

घाटकोपर इमारत दुर्घटना : शिवसेनेच्या सुनील शितपला अटक

ढिगाऱ्याखाली 15 तास मृत्यूशी झुंज, राजेश दोशी सुखरुप