बदलापूर : मुंबई महापालिकेनं नुकतंच खड्डे भरण्यासाठी मिडास तंत्र सुरु केलं आहे. यासाठी ऑस्ट्रियाहून महागडं साहित्यही मागवण्यात आलं आहे. बदलापूरच्या एका संशोधकानं याच प्रकारचं साहित्य तयार केलं असून ते ऑस्ट्रियाच्या तुलनेत जास्त टिकाऊ आणि स्वस्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेनं केवळ भ्रष्टाचार करण्यासाठीच हे साहित्य ऑस्ट्रियाहून मागवल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेनं नुकताच मोठा गाजावाजा करुन खड्डे बुजवण्यासाठी मिडास तंत्र वापरणं सुरु केलं आहे. यासाठी अतिशय महागडं साहित्य ऑस्ट्रियाहून मागवण्यात आलं आहे. मात्र बदलापूरच्या एका संशोधकानं हेच तंत्र स्वस्तात शोधून काढलं आहे.
मुंबई महापालिकेनं ज्या प्रकारचं साहित्य ऑस्ट्रियाहून आयात केलं आहे. अगदी तसंच साहित्य बदलापूरच्या स्टेडफास्ट सोल्युशननं तयार केलं आहे. हे साहित्य खड्डे साफ करुन त्यात टाकल्यास पाच वर्ष खड्डे पडणार नाहीत, असा दावा या कंपनीनं केला आहे.
विशेष म्हणजे मिडास तंत्रासाठीचं साहित्य जवळपास 140 रुपये प्रतिकिलोच्या दरानं मुंबई महापालिकेला मिळत असताना बदलापूरचं वंडरपॅच मात्र फक्त 40 रुपये किलोच्या दरात उपलब्ध होत आहे. याबाबत आपण मुंबई महापालिकेला प्रस्तावही दिला होता, मात्र केवळ भ्रष्टाचार करता यावा, म्हणून पालिकेनं ऑस्ट्रियाहून साहित्य मागवल्याचा आरोप स्टेडफास्ट कंपनीचे शैलेश देशपांडे यांनी केला आहे.