मुंबई : मुंबई विद्यापीठातील घोळावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मौन सोडलं आहे. विधानपरिषदेत उपस्थित लक्षवेधीला उत्तर देताना राज्यपालांच्या निर्देशानुसार 31 जुलैपूर्वीच निकाल लावण्याचं आश्वासन तावडेंनी दिलं.
विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ न देण्याची हमी विनोद तावडेंनी दिली आहे. कुलसचिवांची बदली राज्य सरकारने नाही, तर केंद्राने केल्याची माहिती विनोद तावडेंनी दिली.
कुठल्याही दुसऱ्या विषयाचा प्रोफेसर पेपर तपासत नाही. मात्र तसे आरोप होत असल्यास मी तपासणी करेन. पेपर तपासणीसाठी मनुष्यबळ वाढवू, मात्र गुणवत्तेत तडजोड करणार नाही, अशी हमी तावडेंनी दिली.
आर्ट्सचे निकाल परवापर्यंत लागतील. 61 हजार 992 पेपर तपासायचे बाकी आहेत. कॉमर्सचे पेपर तपासणं कठीण आहे. 3 लाख 75 हजार पेपर बाकी असून दरदिवशी 75 हजार तपासायचं आवाहन आहे. लॉ विषयाच्या 40 हजार उत्तरपत्रिका असून लॉ आणि मॅनेजमेंटला शिक्षक मिळत नसल्याचंही तावडे म्हणाले.
एकूण उत्तरपत्रिका - 17 लाख 68 हजार 441
तपासलेल्या उत्तरपत्रिका - 12 लाख 48 हजार 492
तपासण्यास बाकी - 5 लाख 19 हजार 949
मुंबई विद्यापीठात मंगळवारच्या दिवसात 1 लाख 30 हजार पेपर तपासून झाले, 5 हजार 30 शिक्षकांकडून पेपर चेकिंग झाल्याची माहिती आहे.
मुंबई विद्यापीठा अंतर्गत 1984 मध्ये 80 महाविद्यालयं होती. तेव्हा परीक्षा विभाग जेवढा होता, तितकाच अजूनही आहे. मात्र 31 जुलैपर्यंत सर्व निकाल लावण्याची जबाबदारी शासन म्हणून स्वीकारतो, असं तावडे म्हणाले.