मुंबई : एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता उर्वरीत दहावी बोर्डाचा भूगोलाच्या पेपर बद्दल लवकरच निर्णय घेऊन हा पेपर रद्द होण्याची शक्यता आहे. दहावीचा भुगोलाचा पेपर दि. 21 मार्च 2020 रोजी घेण्यात येणार होता. मात्र, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा पेपर पुढे ढकलण्यात आला. आता हा लॉकडाऊन आणि सद्यस्थितीत कोरोना पॉझिटीव्हचा राज्यातील आकडा पाहता हा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता लक्षात घेता आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा पेपर रद्द करण्याची मागणी केली असून पुढील 4 दिवसात याबाबत निर्णय घेणे अपेक्षित आहे.


त्यामुळे राज्यातील सद्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये या दृष्टिकोनातून हा पेपर रद्द करून सरासरी गुण देण्यात यावे अशी भूमिका आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेदरम्यान केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन वर्षा गायकवाड यांनी दिले. ज्यावेळी संचारबंदी राज्यात लागू करण्यात आली. त्यावेळी याबाबत तातडीने निर्णय घेऊन 14 एप्रिल नंतरची पुढील परिस्थिती पाहून हा पेपर कधी घ्यायचा हा निर्णय घेतला जाईल, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यावेळी सांगितलं होतं. पण सद्य परिस्थिती पाहता हा पेपर रद्द करण्यात येणार असल्याची माहिती आहे.


केबल चालकांकडून तीन महिन्यांची रक्कम वाहिन्यांनी घेऊ नये ; मनसे केबल सेनेची मागणी


सरासरी गुण देण्याचा निर्णय


राज्यातील 18 लाख 64 हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास या विषयांचे पेपर दिले आहेत. आता भुगोलाचा पेपर राहिला असून विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशावर या पेपरच्या गुणाचा परिणाम होणार नाही. याची खबरदारी घेतली जाऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर दहावीचा निकाल पाच विषयांचाच लावायचा की पाच विषयांच्या गुणांची सरासरी करुन भुगोल विषयाला गुण द्यायचे याबाबत विचारविनिमय केला जातोय. शिवाय ज्या विषयांच्या उत्तरपत्रिका पडताळणी अन्‌ फेरपडताळणीचे काम लॉकडाउनमुळे संथगतीने सुरु असल्याने निकालही लांबणीवर पडेल, अशी शक्‍यता व्यक्‍त होत आहे.


 Coronavirus | देशात 24 तासात कोरोनाचे 678 नविन रूग्ण, 33 जणांचा मृत्यू : आरोग्य मंत्रालय


'याबाबत सरासरी गुण किंवा अन्य मार्ग निवडताना इतिहास व भूगोल या विषयांचे "अंतर्गत 20 गुण" विचारात घेतले जावेत. अंतर्गत गुण या अगोदरच सर्व शाळांनी शिक्षण मंडळाकडे पाठवले आहेत. याशिवाय आज असलेली स्थिती लक्षात घेऊन झालेल्या परीक्षेच्या उत्तर पत्रिका सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत पोहचल्यास पेपर तपासणीचे काम घरून होऊ शकेल.' अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी पत्र लिहून केली आहे. तर ही परीक्षा रद्द केल्यास बेस्ट ऑफ फाईव्ह विषय असल्याने फार मोठा निकालावर फरक पडणार नाही. ही घोषणा लवकरात लवकर करून पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांना तणावमुक्त करावे. नववीसाठी तसेच अकरावीसाठी शिक्षण विभागाने जुन महिन्यात निर्णय घ्यावा, अशी मागणी हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरीचे शिक्षक उदय नरे तसेच भाजप शिक्षक आघाडीच्या संयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे. त्यामुळे लवकरच हा निर्णय घेऊन हा पेपर रद्द करण्याची आणि पुढील संभ्रम दूर करण्याची शक्यता आहे.


Dharavi Corona Positive | धारावीत कोरोनाचे पाच नवे रुग्ण, 5 पैकी 2 निजामुद्दीनहून परतल्याची माहिती