नवी दिल्ली : जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 6412 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. आतापर्यंत 199 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 504 कोरोनाचे रुग्ण बरेही झाले आहेत. गेल्या 24 तासात 678 नवीन कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले असून 33 जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, काल 16002 लोकांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली, केवळ 0.2 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. देशात अद्याप कम्युनिटी ट्रान्समिशन सुरु झालेलं नाही, मात्र आपण सावध राहणे गरजेचं आहे. कोरोनाचे टेस्ट 146 सरकारी प्रयोगशाळांमध्ये केली जात आहे. तर 67 खासगी प्रयोगशाळांनाही कोरोनाची टेस्ट करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनावर उपचार करण्यासाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन गोळी महत्त्वाची ठरत आहे. आपल्याला एक कोटी हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची गोळ्यांची गरज आहे. तर आपल्याकडे 3.28 कोटी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन गोळ्या सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे अतिरिक्त गोळ्या निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संयुक्त सचिवांनी दिली.
भारत सरकारने 20 हजार 473 विदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवलं आहे. त्याचबरोबर परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे असून त्यानंतर इतर देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
प्रत्येक राज्याने लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. कोणतीही सामाजिक, धार्मिक मिरवणूक किंवा मेळावा भरणार नाही याची काळजी घ्या. सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवा, जेणेकरून कोणतीही चुकीची माहिती त्याद्वारे परसरणार नाही, अशा सूचना गृहमंत्रालयाने राज्य सरकारांने दिल्या आहेत.
मागील 24 तासांत देशांत झालेल्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्रात आठ, गुजरात आणि मद्यप्रदेशात प्रत्येकी तीन, जम्मू-काश्मिरमध्ये दोन तसेच पंजब, उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये प्रत्येकी 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये 9, तर पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तेलंगणामध्ये सात लोकांचा मृत्यू झाला आहे