अंधेरी : मुंबईतील (Mumbai) गणपती मूर्ती हे अनेकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. त्यामुळे गणपती (Ganpati) पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक लोकं मुंबईत येत असतात. मुंबईतील प्रसिद्ध गणपतीच्या यादीत असलेल्या अंधेरीचा राजा मंडळाकडून पण एक वेगळीच अट यावेळी भक्तांसाठी घालण्यात आली. अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांना हाफ पॅन्ट, शॉर्ट स्कर्ट मनाई करण्यात आली आहे. तर या निर्णयाला विरोध देखील होण्याची शक्यता आहे.
निर्णय का घेण्यात आला?
मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून यावर स्पष्टीकरण देखील देण्यात आलं आहे. यावेळी बोलतांना कार्यकर्त्यांनी म्हटलं की, दर्शनाला येताना संपूर्ण पोशाखात यावं. त्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हाफ पॅन्ट, शॉर्ट स्कर्ट न घालून येता पूर्ण पॅन्ट घालावी. तसेच स्लिव्हलेस कपडे घालून येण्यावर देखील मंडळाकडून मर्यादा घालण्यात आल्या आहेत. संपूर्ण बाह्या असलेले कपडेच घालून यावे असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. तर देवदर्शन करताना लोकांना काही अयोग्य वाटेल असं काहीही न घालण्याचं आवाहन देखील मंडळाकडून करण्यात आलं आहे. मागील वर्षी देखील मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी देखील या मुद्द्यावरुन बराच वाद झाला होता. पण तराही मंडळाकडून यंदाच्या वर्षात देखील हा निर्णय घेण्यात आला आहे.
अंधेरीच्या राजाचं 'हे' आहे वैशिष्ट्य
मुंबई उपनगरातील अंधेरीच्या आझादनगर परिसरात अंधेरीचा राजा विराजमान होतो. विशेष म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन न होता चतुर्दशीनंतर येणाऱ्या संकष्टीला या गणपतीचं विसर्जन करण्यात येतं. अंधेरीतील वर्सोवा चौपाटीवर या गणपतीचं विसर्जन होतं. पुढील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानमित्ताने शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा अंधेरीच्या राजाला करण्यात आला आहे.
अवघ्या एका दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा उत्साह शिगेला पोहचलाय. तर मुंबईतील मूर्तींचं आकर्षण हे प्रत्येकाला असतं. पण जर मंडळाकडून अशा अटी असतील तर या सणाला वादाचं गालबोट लागण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान यावर पुन्हा एकदा वाद पेटणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासन सुसज्ज असतं. पण अशा काही नियम आणि अटींमुळे ही शांतता भंग होण्याची देखील शक्यता असते. तर यावर प्रशासनाकडून काही पावलं उचलण्यात येणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.